या रणनीतिक करारामुळे ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगभरात
२४x७ वैद्यकीय आणि प्रवाससहाय्य सेवा होणार उपलब्ध
मुंबई: भारतातील अग्रगण्य खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने (आरजीआयसीएल) यूके-स्थित ‘मेफेअर वी केअर लिमिटेड’ या जागतिक आरोग्य लाभ प्रशासक कंपनीशी रणनीतिक भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे ‘मेफेअर’च्या आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अखंड, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सहाय्य मिळणार आहे.
या करारानुसार, ‘मेफेअर वी केअर’ २४x७ बहुभाषिक ‘अलार्म सेंटर’ चालवणार आहे आणि त्यातून परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या ‘रिलायन्स जनरल’च्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मदत पुरविली जाणार आहे. हे केंद्र वैद्यकीय तसेच प्रवाससंबंधित सहाय्यासाठी एकाच ठिकाणी संपर्काचा केंद्रबिंदू ठरेल. ‘आरजीआयसीएल’च्या ग्राहककेंद्री आणि जागतिक स्तरावर सुलभ उपायांच्या कटिबद्धतेला यातून अधिक बळकटी मिळेल.
या सेवांच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत :
· परदेशात पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट दावे प्रक्रियेस सहाय्य.
· वैद्यकीय सल्लामसलत, अपॉइंटमेंट ठरवणे आणि टेलि-असिस्टन्स सेवा.
· आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर आणि पुनरागमन यांबाबतचा समन्वय — गंभीर परिस्थितीत वेळेवर आणि विश्वसनीय मदत सुनिश्चित करण्यासाठी.
· प्रवाससंबंधित सहाय्य, उदा. व्हिसा व लसीकरणविषयक माहिती, दुभाषाचे संदर्भ, दूतावासतून सहाय्य, हरवलेली कागदपत्रे किंवा सामान शोधण्यास मदत.
· सहानुभूतीपूर्ण भेटी, अल्पवयीन मुलांचे पुनरागमन आणि इतर अत्यावश्यक सेवांचे समन्वय — वैद्यकीय गरजांपलीकडील सर्वांगीण काळजीची हमी.
या भागीदारीविषयी बोलताना रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन म्हणाले, “रिलायन्स जनरलमध्ये आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना अधिक मूल्य देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. ‘मेफेअर वी केअर’शी झालेली भागीदारी आम्हाला जागतिक दर्जाची, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि प्रवाससहाय्य सेवा देण्यास सक्षम बनवेल. त्यामुळे आमचे ग्राहक जगात कुठेही असले तरी त्यांना सुरक्षितता आणि काळजीची भावना मिळेल.”
हा करार १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला असून, त्याची सुरुवातीची मुदत तीन वर्षांची आहे. पुढे त्याचे नूतनीकरण करण्याची तरतूदही आहे. विमा क्षेत्रात नवोन्मेषी आणि ग्राहक-केंद्रित उपाय पुरवण्याच्या दोन्ही संस्थांच्या दीर्घकालीन बांधिलकीचे ही भागीदारी म्हणजे प्रतीक आहे.

