पुणे, १३ ऑक्टोबर – “पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा उजळविण्याची आणि पुण्याला भारताची सायकल राजधानी बनविण्याची वेळ आली आहे. आमचे उद्दिष्ट संपूर्ण शहरभर सुमारे ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणे आहे, ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वार सुरक्षितपणे प्रवास करू शकतील,” असे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.
श्री. राम हे हिंदआयन शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक या उपक्रमात सहभागी झालेल्या सायकलस्वारांना संबोधित करत होते. या कार्यक्रमात टेरीटोरियल आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, भारतीय वायुदल, तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लब आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
“सायकलिंग हे पर्यावरणपूरक तसेच आरोग्यास उपयुक्त असे वाहतूक साधन आहे. त्यामुळे सायकलस्वारांसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे श्री. राम यांनी पुढे सांगितले. “या उद्देशाने महानगरपालिका ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ साठी ७५ किमी सायकल मार्ग तयार करत आहे. हा उपक्रम जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. या उपक्रमांमुळे पुणे लवकरच देशाची सायकल राजधानी म्हणून ओळखले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
उमाकांत दिग्गीकर, इमारत परवाना विभागातील सहाय्यक अभियंता, ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, यांनी सांगितले – “भारतीय टेरीटोरियल आर्मी, वायुदल आणि बीएसएफच्या जवानांसोबत सायकल चालविण्याचा सन्मान लाभला. सिंहगडाच्या माथ्यावर भारतीय सैन्याने पुरविलेला भोजनाचा अनुभव संस्मरणीय होता. पुणे महानगरपालिकेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे आणि वैद्यकीय सहाय्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी झाला. आम्ही पुढील हिंदआयन उपक्रमांमध्ये नक्की सहभागी होऊ.”
हिंदआयन सायकल मोहिमेचे आयोजक व जगभर भूमार्गे भ्रमण करणारे पहिले भारतीय विश्नुदास चपके यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी नागरिकांना पुढील उपक्रमांसाठी निमंत्रण दिले –
“आम्ही सर्व पुणेकरांना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती विशेष शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. तसेच पुणेकरांना दिल्लीतील कर्तव्य पथावरील २० किमी सायकल परेड, सिंधुदुर्गमधील १०० किमी स्टेज रेस, मुंबई ते पुणे राईड, तसेच दिल्ली ते आग्रा ‘डबल सेंच्युरी राईड’ (यमुना एक्सप्रेसवे मार्गे) या विविध स्तरांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल.”

