इस्रायलच्या संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असताना गदारोळ झाला. जेव्हा ट्रम्प संसदेला संबोधित करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने ट्रम्प यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याला तेथेच अडवत संसदेच्या बाहेर काढण्यात आले. गदारोळ करणाऱ्या खासदाराचे नाव ओफर कासिफ आहे. जे इस्रायलच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. ते अरब-बहुल-हदाश-ताअल पक्षाचे एकमेव ज्यू सदस्य आहेत आणि ते गाझापट्ट्यातील कारवाईचे प्रमुख विरोधी आहेत. नेसेटचे सदस्य अयमान ओडेह आणि ओफर कासिफ यांनी भाषणादरम्यान Genocide म्हणजे नरसंहार लिहिलेला पोस्टर दाखवला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा कराराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर इस्रायलच्या संसदेला भेट दिली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचा इस्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला. यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करारासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. “20 धाडसी ओलिस ठेवलेल्या व्यक्ती परत येत आहेत. आज बंदुका शांत आहेत, सायरन शांत आहेत. ईश्वर इच्छितो की ही भूमी आणि हा प्रदेश अनंतकाळ शांत राहील.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला सभागृहातून बाहेर काढले. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, ही सलोख्याची सुरुवात आहे. हा एका नवीन मध्यपूर्वेचा ऐतिहासिक उदय आहे. नेतन्याहू यांच्याशी व्यवहार करणे सोपे नाही, पण यामुळेच ते महान आहेत. हा एक अत्यंत असामान्य वळणाचा काळ होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील अलीकडील युद्धविराम आणि स्थिरतेचा उल्लेख करताना म्हटले की, “आकाश शांत आहे, बंदुका शांत आहेत आणि पवित्र भूमीवर शांतता आहे.” डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब देश आणि मुस्लिम नेत्यांचे आभार मानले, जे ओलिसांना सोडवण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, “हा इस्रायल आणि जगासाठी एक मोठा विजय आहे की हे सर्व देश शांततेसाठी भागीदार म्हणून एकत्र काम करत आहेत.” यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले होते की, “आमच्या शत्रूंना आता समजले आहे की इस्रायल किती शक्तिशाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणे ही एक मोठी चूक होती.”
नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक करताना संसदेत उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात म्हटले की, “मी कधीही कोणालाही आमचा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे जगाला इतक्या वेगाने, निर्णायकपणे आणि ठामपणे पुढे नेताना पाहिले नाही.” यासोबतच, नेतन्याहू यांनी इस्रायली कुटुंबांसाठी करार घडवून आणल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर सर्व काही बदलले.


