‘किराना परंपरा’ कार्यक्रमात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा उलगडला सांगीतिक जीवनप्रवास
पुणे : किराना घराण्याला उच्चतम अवस्थेत नेऊन ठेवण्यात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे मोलाचे योगदान आहे. गायनात कोरडे पांडित्य नको तर रंग भरणे अपेक्षित आहे, असे मानणारे आणि अध्यात्माकडे नेणारे सूरमग्न गायन करणारे अंतर्मुख कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. माधुर्य व स्वरात रममाण होणे ही किराना घराण्याची परंपरा त्यांच्यामुळे प्रवाहित राहिली. तालासह खेळताना ठोस रूपात लयकारी दर्शविणारे, गाणे व जीवन यात भेद न करणारे व स्वत:च्या प्रतिभेतून रागरूपाचा छाप पाडणारे चौमुखा गायक म्हणून ते प्रसिद्ध होते.
अशा ख्यात गायकाचे वैशिष्ट्य उलगडले गेले ते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘किराना परंपरा’ या कार्यक्रमात. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतील या विशेष मालिकेतील उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यावर आधारित असलेला पहिला कार्यक्रम रविवारी (दि. १२) आयोजित करण्यात आला. यात शास्त्रीय संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जीवनप्रवास अभ्यासपूर्ण मांडणीतून उलगडला. स्वरमयी गुरुकुलच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीताच्या रसिकांसह अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
युवा अवस्थेत लढंत-भिडंत करणारे उस्ताद अब्दुल करीम खाँ सारंगी, बीन, तबला, पखवाज तसेच ताशा वादनातही निपुण होते. त्यांच्याकडे रागांचा असिमित संचय होता. परंतु परिपक्वता आणि कौटुंबिक कारणांमुळे ते विरक्तीकडे वळले. त्यानंतर त्यांचे गायन परमेश्र्वरचरणी समर्पित झाले. त्यांच्या गायनात हृदयाची तार छेडण्याची ताकद होती.
तानपुऱ्याच्या झंकारात विरघळून जाणारी सूरप्रधान गायकी, परमोच्च सुरेलपण तसेच सुरांच्या केंद्रबिंदूपर्यंत जात मध्य आणि तार सप्तकात सहज फिरत असणारा आवाज याने उस्ताद Aअब्दुल करीम खाँ यांचे गाणे दैवी बनले. खाँसाहेब यांनी कधीही अनैसर्गिक आवाज लावला नाही तर प्रचंड मेहनत व रियाजाने त्यांनी सुरांची सिद्धी प्राप्त केली. त्यांना जन्मजात मिळालेल्या आवाजाला रियाजाची जोड देत तानपुऱ्याच्या गुंजनात आपले गुंजन एकरूप करणे, गाताना केवळ ‘आ’कार न लावता काव्यातील स्वरव्यंजने, शब्द यावर जोर देत रियाज करणे आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे याला त्यांनी प्राधान्य दिले.
कंठसाधनेवर विचार करत कुठल्या सुरांवर लक्ष केंद्रीत करायचे, कंठसाधना कशी करायची, रागाचा सखोल विचार कसा करायचा आणि यातून गायन जास्तीत जास्त प्रभावीपणे सादर करणे ही वैशिष्ट्ये जपत त्यांनी पुढील पिढीला देखील मार्गदर्शन केले.
उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या आवाज, प्रयोग, निषाद, तंबोरे, रागविचार/रागसंच, गायनशैली, बंदिश, उच्चार, लयताल विचार, आलाप, बीन अंग, ताना, सरगम अशा विविध वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत रंगलेल्या या अभ्यासपूर्ण विवेचनात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी रागदारी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दाखविलेले मनाचे खुलेपण, जाहीर जलसे, त्यांची स्वरलिपी, गायन पद्धती तसेच त्यांनी स्थापन केलेल्या आर्य संगीत विद्यालयाचे महत्त्व अशा अनेक अंगांनाही डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी स्पर्श करत विवेचन अधिकाधिक अभ्यासपूर्ण व रंजक केले.
विवेचनादरम्यान राग ललत, बिलावल, अभोगी, मारवा थाटाचा गौरी, जौनपुरी अंगाचा खट, बसंत, शुद्ध कल्याण आणि दरबारी कानडा या रागातील उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी गायलेल्या रचनांची झलक देखील ऐकविली.
उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी केलेले श्रुती संशोधन, निर्माण केलेली शिष्य परंपरा आणि गायकच नव्हे तर वादकांनाही दिलेले प्रशिक्षण अशा विविध पैलूंचा उलगडा या कार्यक्रमात करण्यात आला.
प्रास्ताविकात कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या अश्विनी वळसंगकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

