अशोक समेळ लिखित ‘द्रौपदी काल..आज..उद्या’ कादंबरीचे प्रकाशन
पुणे : ‘द्रौपदी काल..आज..उद्या’ ही केवळ एक साहित्यकृती नव्हे तर स्त्री शक्तीचे अखंड चिंतन आहे. स्त्रीच्या सामर्थ्याची, धैर्याची जीवंत प्रतिमा आहे. या साहित्यकृतीतून मनोरंजनासह सामाजिक संदेशही दिला गेला आहे. लेखकाने यातून समाजाला फक्त जागृतच नव्हे तर समृद्ध देखील केले आहे. यातील नायिका म्हणजेच द्रौपदी ही स्वयंभू, स्थितप्रज्ञ, कुशल, बुद्धिमान, प्रगल्भ, सहनशीलता आदी गुण दर्शविणारी महानायिका आहे. आजची द्रौपदी अन्यायाकडून न्यायाकडे जाणारी, दुर्बलतेकडून सबलतेकडे जाणारी आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी अशोक समेळ लिखित ‘द्रौपदी काल..आज..उद्या’ या द्रौपदीची विविध रूपे उलगडणाऱ्या कादंबरीचे प्रकाशन आज (दि. 12) वैशाली माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षपदावरून बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ, अंमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रसिद्ध अभिनेते संग्राम समेळ मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
डॉ. रघुनाश माशेलकर म्हणाले, या साहित्यकृतीच्या मागे प्रचंड संशोधन, मेहनत आहे. ही साहित्यकृती वाचकांना सामाजिक संदेश देत समाजाला घडवू शकण्याचे सामर्थ्य असणारी आहे. आजची द्रौपदी राष्ट्रपती भवन, अंतराळ, रणांगण अशा सर्व ठिकाणी ठामपणे अस्तित्व दर्शवित आहे. अवकाशात एकटे राहणे हे आधुनिक द्रौपदीचे रूप आहे. या पुस्तकातून कालची द्रौपदी ओळखा, आजच्या द्रौपदीला सन्मान द्या आणि उद्याची द्रौपदी घडवा याचे समग्र दर्शन घडते.
लेखनाविषयी बोलताना अशोक समेळ म्हणाले, महाभारत घडविणारी स्त्रीशक्ती म्हणजेच अग्निशिखा हिच्याविषयी लिखाण करावे या हेतूने या कादंबरीची निर्मिती केली. महाभारताच्या आधीची द्रौपदी, वस्त्रहरणानंतर पांडवांचे षंढत्व नाकारणारी द्रौपदी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना चेतवत राहिलेली द्रौपदी ही समाजात पतीव्रता म्हणून ओळखली जाते. तिच्यातील अनेक गुण आजच्या स्त्रीयांमध्ये देखील आहेत या विषयीही या कादंबरीत भाष्य केले आहे.
डॉ. अविनाश जोशी म्हणाले, महाभारत आणि रामायणातून समाजाला जगण्याची मूल्ये दर्शविली जातात. महाभारतातील एका स्त्रीशक्तीचा म्हणजेच द्रौपदीचा विलोभनीय प्रवास या कादंबरीतून साकारला आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी 120 वर्षांची साहित्य परंपरा लाभलेल्या वास्तूत अशोक समेळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या कादंबरीचे प्रकाशन होत आहे याचा आनंद आहे, असे सांगितले.
मान्यवरांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांचे होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संजीवनी समेळ, श्रद्धा समेळ आणि संग्राम समेळ यांनी ‘द्रौपदी काल..आज.. उद्या’ या कादंबरीतील प्रसंगांचे प्रभावी अभिवाचन केले त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

