पुणे-निलेश घायवळला कोणाचा राजकीय पाठिंबा आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ माध्यमांना दाखवला. या व्हिडिओत एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन घायवळचे नाव घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी सचिन घायवळ मंचावर उपस्थित असल्याचा व्हिडिओ देखील रोहित पवार यांनी दाखवला. तसेच भाजप गुंडांच्या समर्थनात मैदानात उतरल्याचा आरोप केला.
या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे निलेश घायवळशी संबंध असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेत, घायवळला मविआ सरकारच्या काळात पासपोर्ट मिळाला असून, स्थानिक आमदार रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव आणला नाही ना? असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या या आरोपानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. “गुंडाच्या समर्थनात भाजप मैदानात आहे,” अशी टीका करत त्यांनी निलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीच्या काळात असे प्रकरण घडले असते, तर भाजप नेते आक्रमक झाले असते, पण आता ते शांत आहेत, असे पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावरही टीका केली. शिरोळे यांना अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जाते, पण त्यांनी नेत्यांनी पाठवलेला कागद वाचत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या अभ्यासाच्या अभावामुळे त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, असे पवार म्हणाले.
आपल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ माध्यमांना दाखवला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राम शिंदे यांच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याचे नाव घेतले होते आणि सचिन घायवळ त्यावेळी मंचावर उपस्थित होता, असा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेतोय असे म्हणत नाही. राम शिंदे यांनी जी नावे दिली, ती नावे तिथे वाचून दाखवली. यानंतर रोहित पवार यांनी एका प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन घायवळ याचे नाव घेताना माध्यमांना दाखवले. सचिन घायवळचे नाव देवेंद्र फडणवीस घेत असतील, आणि केवळ माझ्यासोबत सचिन घायवळचे फोटो आहेत म्हणून टीका करायची, तर असले भाजप प्रमाणे खालच्या लेव्हलचे राजकारण आम्ही करत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

