पुणे-
कात्रज -धनकवडी परिसरात आयोजित करण्यात आलेले “कार्यसिद्धी महाआरोग्य शिबीर” येथे संपन्न झाले . “आपले आरोग्य — आमची जबाबदारी” या सामाजिक संदेशाने प्रेरित होऊन या आरोग्य सेवेच्या महायज्ञात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला.दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेत पुणे महानगरपालिका मैदान, मोहननगर, धनकवडी येथे हे शिबिर पार पडले. दोन दिवस चाललेल्या या महाआरोग्य शिबिरात नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच गरजूंना शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात आली.
या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, नेत्र, कान-नाक-घसा, दंत, हाडे व सांधे, स्त्रीरोग, त्वचारोग, बालरोग आणि सामान्य वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. नागरिकांसाठी रक्तदाब, साखर तपासणी, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने मोफत करण्यात आल्या.
गरजू रुग्णांना त्वरित औषधोपचार तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली. अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरातील सेवा आणि व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचवणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबद्दल जनजागृती करणे हा होता. शिबिरात स्वयंसेवक, वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
“कार्यसिद्धी महाआरोग्य शिबीर” या माध्यमातून आरोग्य सेवेबाबत लोकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन अधिक व्यापक प्रमाणात करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

