पुणे-येथील माजी आमदार रवी धंगेकर यांच्या वक्तव्यांमुळे कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ प्रकरण राज्यात गाजत असताना धंगेकर यांच्याबाबत मी त्यांच्या ‘बॉस’ शी बोलेन असे सांगत घायवळला पासपोर्ट देण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांवर दबाव आणणाऱ्या मविआ सरकारमधील नेत्याची आम्ही निश्चित चौकशी करू असे आज येथे CM देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुका महायुतीतून लढवण्याचा भाजपचा प्रयत्न:मित्रपक्षांवर टोकाची टीका टाळा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात मित्रपक्षांवर टोकाची टीका होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना महायुतीतून निवडणूक लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ लॉन्स येथे शनिवारी ही बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील विविध भागांतील भाजपचे आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला, ज्यात भाजपसाठी सकारात्मक परिस्थिती दिसून आली. शक्य असेल तेथे महायुतीतूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. महायुतीतून लढायचे की स्वतंत्र, याचे संपूर्ण अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आणि त्यात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मदत वाटप झाले असून, दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. काही जणांना दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मदत मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यावर, उद्धव ठाकरे यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ येणारच नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे. इतर पक्षातून कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे. बाहेरून चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल, तर भाजपचे कार्यकर्ते त्याला समजून घेतात आणि सामावून घेतात. यामुळेच भाजप मोठा झाला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

