पुणे, ता. 18 – रामायणातील प्रसंगांच्या सर्जनशील आणि स्वयंभू निवडक कल्पना चित्रांचे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आर्ट इंडिया फाउंडेशनच्या संचालिका डॉ. प्राची साठे यांनी कळविली आहे.

5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय मिलिंद साठे यांच्या संकल्पनेतून खुला आसमान या उपक्रमाअंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या काळातही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पंधरा राष्ट्रांतील 1820 शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातून 287 चित्रे पारितोषिकपात्र ठरली. भौगोलिक क्षेत्र, वयोगट आणि शैलीच्या आधारे निवडक 121 चित्रांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
रामायणातील रामाचा जन्म, बालपण, विश्वामित्रांच्या आश्रमातील भावंडांसमवेत शिक्षण, सिता स्वयंवर, वनवासातील काळ, शूर्पणखेचे गर्वहरण, सुग्रीव, बाली यांची साथ, हनुमानाची भक्ती, सिता-हनुमान यांची अशोकवनातील भेट, बिभिषणाची भेट, कुंभकर्णाशी लढाई, रावण वध आणि अयोध्येतील स्वागत असे विविध प्रसंग चित्रबद्ध करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांची प्रतिक्रिया
खुला आसमान या उपक्रमांतर्गत मुलांना स्वतंत्रपणे चित्र काढण्यासाठी किंवा रंगविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मुलांच्या भावना रेषा, आकार आणि रंगाांद्वारे उत्स्फूर्तपणे व्यक्त झाल्या आहेत. ऐकलेले, वाचलेले किंवा समजलेले रामायण दृष्य करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आबालवृद्धांना नक्की आवडेल.

