1.11 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि इनोव्हा कार जप्त
सांगली- मिरजेत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा मोठा भांडाफोड झाला असून, यामध्ये कोल्हापूर पोलिस दलातील हवालदारच मास्टरमाईंड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून 1.11 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असून, त्याच्यासह सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी 500 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्या खपवण्याचे रॅकेट चालवत होती. मिरजेत व्यवहारासाठी येणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. चौकशीतून समोर आले की, या टोळीचे नेतृत्व स्वतः पोलिस हवालदार इब्रार इनामदार करत होता. त्याने कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीतील ऑफिसमध्ये लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर आणि अन्य उपकरणांच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. इनामदार सध्या कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असल्याने, पोलिस विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.
महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस वेवरील निलजी बामणी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी सुप्रीत देसाई याला अटक केली असता त्याच्याकडून 84 बनावट नोटा (500 रुपयांच्या), एकूण 42 हजार रुपये किंमतीच्या सापडल्या. चौकशीतून इब्रार इनामदार याचे नाव समोर आले. त्याच्या कार्यालयातून बनावट नोटा तयार करण्याचे संपूर्ण साहित्य, तसेच कोल्हापूर आणि मुंबईतील इतर साथीदारांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रेला अटक केली. या टोळीच्या ताब्यातून 19,687 बनावट 500 रुपयांच्या नोटा, 429 बनावट 200 रुपयांच्या नोटा, इनोव्हा कार, प्रिंटर आणि स्कॅनर असा 1 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी कोल्हापूर आणि मुंबई दरम्यान बनावट नोटा छापून राज्यभर खपवत होती. प्राथमिक चौकशीत, नोटांचा दर्जा अत्यंत उच्च दर्जाचा असून त्या खऱ्या चलनासारख्याच दिसतात. पुढील तपासातून अजून काही बडे मासे समोर येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
या ऑपरेशनचं नेतृत्व सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या रुपाली बोबडे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. तसेच सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, अजय पाटील आदी अधिकाऱ्यांचा या मोहिमेत महत्त्वाचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई आणि कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सुरू असून, या बनावट नोटा टोळीचे इतर संभाव्य संबंध राज्यभरातील विविध गुन्हेगारी नेटवर्कशी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

