पुणे: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत पुण्यात संविधान जागर अभियान समितीच्या वतीने निषेधसभा पार पडली. गोपाळ कृष्ण गोखले चौक येथील कलाकार कट्ट्यावर 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता ही सभा झाली.सभेदरम्यान ‘हल्लेखोरावर कारवाई झालीच पाहिजे’, ‘जातीयवाद मुर्दाबाद’, ‘द्वेषाचे मुर्दाबाद’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘सामाजिक समता जिंदाबाद’, ‘लोकशाही जिंदाबाद’, ‘धार्मिक सलोखा जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लोकायतच्या निमंत्रक अलका जोशी, काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, जनसंघर्ष समितीचे अॅड. संदीप ताम्हनकर, डॉ. संदीप बाहेती, राष्ट्र सेवा दलाचे प्रशांत दांडेकर, अॅड. संतोष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
“हा हल्ला व्यक्तीवर नाही, तर न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर आहे” अशी एकमुखी भूमिका उपस्थितांनी मांडली.न्या. कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, “सरकारविरोधात निकाल दिल्यास अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, असा दबाव न्यायव्यवस्थेवर आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी पुणे पोलिसांकडे ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्याची विनंतीही केली.
गोपाळ तिवारी यांनी म्हटले, “ही घटना न्यायव्यवस्थेला खुल्या आव्हानासारखी आहे. १४० कोटी भारतीयांचा हा अपमान असून, संबंधित हल्लेखोरावर त्वरित कारवाई झाली पाहिजे.”अॅड. संतोष म्हस्के यांच्या मते, “हा हल्ला मनुवादी मानसिकतेतून प्रेरित आहे.”
तर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार नवीन पिढीत रुजविण्यात कमी पडलो त्याची फळ आपल्या समाजाला फेडावी लागत आहेत अस परखड मत लोकायतच्या समन्वयक अलका जोशीयांनी मांडले. ह्या घटनेचा निषेध हा चौका चौकात होण्याऐवजी सोशल मीडियावर होत आहे याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली. निषेध सभेचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

