- पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये सर्व पक्षीय निषेध आंदोलन
पुणे :

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ तसेच देशात कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विरोधात पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन येथे सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. शांतीनगर येथील चौकात उपस्थितांनी घोषणा देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी या व्यक्तीवर देशद्रोह व सुमोटो अंतर्गत कारवाईची मागणी केली.त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे भेट देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. मात्र आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोचवून असे आश्वासन पोलिसांनी दिले.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, आमदार बापू पठारे, पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगसेवक ॲड. अय्युब शेख, सागर माळकर, भैय्यासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले, संग्राम रोहम ,अझहर खान , फैयाझ पाशा,, शिवानी माने, डॅनियल मगर, गणेश बाबर, शैलेंद्र मोरे, निखील गायकवाड, सुभाष ठोकले, कैलास गोंधळे, नाना नलावडे, डाॅ साठे , भिमराव वानखेडे आदीसह विविध ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला होऊनही साधा गुन्हा नोंद होत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. भविष्यात याचे उत्तर सर्वांनाच देऊ. मात्र शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला पाहिजे. जे निषेध व्यक्त करणार नाहीत त्यांना आता आगामी निवडणुकांमध्ये जाब विचारला पाहिजे. काही लोक हिंदु-मुस्लिम, मराठा-ओबीसी, बौद्ध आणि मातंग असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संविधानिक मार्गावर नागरिक चालत असल्याने त्याला यश येत नाही, असे अंधारे म्हणाल्या.
आमदार बापु पठारे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला होणे हा गंभीर गुन्हा असल्याचे नमूद केले. तसेच पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करुन घेणार नाही, हे लेखी द्यावे, अशी मागणी पोलिसांना केली.
या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बुट फेकण्याची कृती म्हणजे एका व्यक्तीवर हल्ला नाही. तर हा हल्ला न्यायव्यवस्था, संविधान आणि सर्व सामान्य नागरिकांवर केलेला हल्ला आहे. देशातील नागरिक संविधानावर मार्गक्रमण करतात. ज्यांना संविधान मान्य नाही तेच असा हल्ला करत आहेत. हल्ला करणाऱ्या राकेश तिवारीला देशद्रोही ठरवून तत्काळ कारवाई करायला पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. तेव्हा संबंधितांवर सुमोटो अंतर्गत कारवाई केली. तशीच कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या तिवारी या व्यक्तीवर करायला हवी, असे डॉ. धेंडे म्हणाले. तसेच तिवारी याचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.

