पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांकडे रवींद्र धंगेकर व सुषमाताई अंधारे व अनिल परब या नेत्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.यांच्या केसालाही धक्का लागला तर सरकार जबाबदार असेल असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
राज्यभरात चर्चेस असलेली गुंडांची प्रकरणं अतिशय गंभीर असून या प्रकरणात भूमिका मांडणारे रवींद्र धंगेकर व सुषमाताई अंधारे रवींद्र धंगेकर व सुषमाताई अंधारे यांना सरकारने तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे. यापैकी कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार जबाबदार असेल. म्होरके जरी अंडरग्राउंड असले तरी त्यांच्या गँग इतर सदस्यांच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात आणि विशेष म्हणजे काही गँगला तर मोठ्या व्यक्तींचे वरदहस्त आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी डोळेझाक करू नये.
नेपाळसारख्या बॉर्डर तर देशाबाहेर पळून गेलेल्या गुन्हेगारांसाठी ‘आवो जावो घर तुम्हारा’ असल्यासारख्या झाल्या असून पोलिसांनी अशा बॉर्डर्सवर विशेष लक्ष ठेवायला हवे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना धारेवर धरले आहे. पुणे पोलिसांचा अहवाल डावलून योगेश कदम यांनी घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्याचा आरोप करत या नेत्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आरोपांना उत्तर देताना योगेश कदम अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र आहे. विशेषतः त्यांचे वडील रामदास कदम यांनीही केलेला युक्तिवादही या प्रकरणी विरोधकांनी धुडकावून लावला आहे. यामुळे योगेश कदम यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीकडून नीलेश घायवळ व रोहित पवार यांचा एक फोटो व्हायरल केला आहे. तसेच रोहित पवारांच्या मातोश्री यांनी घायवळची प्रशंसा केल्याचा एक व्हिडिओही समोर आणला आहे. रोहित पवारांनी या राजकारणावरही तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझी आई राजकारणात नाही. समाजकारणात आहे. भाजप आज राजकारण करताना कोणत्या थराला जात आहे? आईला यातील काहीही कळत नाही. ती अतिशय साध्या सरळ स्वभावाची आहे. तिच्या बाजूला कुणी विरोधक येऊन उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही अशी ती आहे. पण नीलेश घायवळ समवेतचा माझा फोटो वापरून भाजप अत्यंत गलिच्छ राजकारण करणार असेल तर त्याचा अर्थ भाजप माझा सामना करण्यास घाबरत आहे असाच होतो, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.आईला कशाला मध्ये आणता? तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची? मी राजकारणात आहे. तुम्हाला काय काढायचे ते काढा, आम्हाला जे काय काढायचे ते काढू. नीलेश घायवळला योगेश कदम यांनी बंदुकीचे लायसन्स कुणाच्या सांगण्यावरून दिले? हे शिवसेना नेते रामदास कदम यांनीच स्पष्ट केले आहे. मी आधीच बोललो होतो सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून लायसन्स दिले गेले आहे. त्याला रामदास कदम यांनी दुजोरा दिला. पण यावरून भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय आहे. असा प्रश्नही रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

