पुणे-खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनि (एनडीए) मध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.हा विद्यार्थी मुळचा उत्तरप्रदेश मधील लखनऊ येथील रहिवासी आहे.आणि मुलाच्या पालकांनी रॅगिंग झाल्याचा आराेप केला आहे. परंतु पोलिसांनी मात्र याबाबत अद्याप काेणतीही स्पष्टता नसल्याचे सांगितले आहे.
संबधित मुलाचे वडील हे लष्करातून निवृत्त झालेले असून ते कुटुंबासह लखनऊ याठिकाणी रहातात. एनडीए मध्ये प्रवेश करण्यासाठीच्या कठीण परीक्षेत मयत मुलगा हा पहिल्याच प्रयत्नात यंदाच्या वर्षी यशस्वी झाला हाेता. एनडीए याठिकाणी 154 व्या तुकडीत तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षणासाठी ताे जुलै महिन्यात दाखल झाला हाेता. एनडीए मधील चार्ली स्काॅडन मध्ये ताे पहिल्या वर्षात शिक्षण घेत हाेता. संबंधित मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट हाेईल.
याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, एनडीए मधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अक्समात मयत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणात काेणती रॅगिंग झाल्याचा प्रकारास दुजाेरा मिळालेला नाही. पोलिसांचा याअनुषंगाने तपास सुरु असून मुलाचे कुटुंबीय भेटल्यानंतर त्यांच्याशी देखील याप्रकरणी अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. याबाबत पुढील तपास उत्तमनगर पोलिस स्टेशन करत आहे.

