पुणे- कुख्यात गुंड, राजकारण्यांचा जवळचा मित्र, आणि अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी राहिलेला हा नीलेश घायवळची आई, कुसुम घायवळ. यांनी News18लोकमत या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असा खळबळजनक दावा केला आहे की, राजकारण्यांनी ठरवून माझ्या मुलाला अडकवले, कारण तो आता गुन्हेगारीच्या बाहेर पडून राजकारणात येण्याच्या तयारीत होता.निवडणुकीत उभे राहू नये,म्हणून राजकीय कट रचला गेला, राजकारणी त्यांना जगू देईनात, पोलीस राजकारणी आणि सारं जग खोटं बोलतंय
कुसुम घायवळ यांनी सांगितले की, नीलेश जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. मात्र, विरोधकांना हे पटले नाही. त्यांनी ठरवून गेम रचला आणि त्याला अडचणीत आणले. या खुलाशानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कुसुम घायवळ यांनी स्पष्टपणे म्हटले की, माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश करायचा होता. तो नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषद निवडणुकीतून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत होता. मात्र काही प्रभावशाली राजकारण्यांना हे मंजूर नव्हते. त्यांना घायवळ भावांना वर येऊ द्यायचे नव्हते. म्हणून त्यांनी माझ्या मुलाला फसवण्यासाठी ठरवून कारस्थान रचले. कुसुम घायवळ यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून नीलेशने गुन्हेगारीपासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मला अनेकदा सांगितले होते की, आई, मला आता आयुष्य नवे सुरू करायचे आहे, गुन्हेगारी सोडायची आहे. पण राजकारणी लोक त्याला तसे करू देत नव्हते. त्यांना तो कायम वादात, पोलिसांच्या फाईलमध्ये आणि तुरुंगाच्या भिंतींतच दिसावा, असे वाटत होते.
कुसुम घायवळ यांनी मुलाखतीत सांगितले की, गेल्या चार वर्षांत आमचे आयुष्य शांत झाले होते. नीलेशने व्यवसाय सुरू केला होता, समाजात मिसळायला सुरुवात केली होती. तो रोज मंदिरात जायचा, सामाजिक कामात भाग घ्यायचा. पण हे काहींना खपले नाही. त्याच्या विरोधात पुन्हा कट रचला गेला. राजकारण्यांनी ठरवले की, तो निवडणुकीत उतरू नये. म्हणूनच त्याला गुन्ह्यात अडकवले गेले. हा सगळा खेळ आहे, सत्तेचा आणि मतांचा, असा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात झालेल्या एका गोळीबाराच्या प्रकरणानंतर नीलेश घायवळ अचानक लंडनला पळून गेला. या घटनेनंतर तो चर्चेत आला आणि पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनसुद्धा त्याला पासपोर्ट कसा मिळाला? आणि पोलिसांच्या देखरेखीखाली असलेला आरोपी देशाबाहेर कसा गेला? असा प्रश्न उभा राहिला. या सर्वावर उत्तर देताना कुसुम घायवळ म्हणाल्या की, माझ्या मुलाने स्वतः काही केले नाही. त्याच्याकडून करवून घेतले गेले. ज्यांनी त्याच्याकडून काम करून घेतले, तेच लोक आता त्याच्याविरुद्ध कारवाई करत आहेत. माझा मुलगा पळून गेला नाही, त्याला पळवण्यात आले. तो निर्दोष होता. न्यायालयाने अनेक गुन्ह्यांत नीलेशला निर्दोष ठरवले होते. जेव्हा तो निर्दोष सुटला, तेव्हा त्याने आयुष्य बदलायचा निर्णय घेतला. पण काहींना हे आवडले नाही. त्यांना घायवळ पुन्हा तुरुंगात हवा होता, असेही त्यांनी सांगितले.
कुसुम घायवळ यांनी थेट राजकारण्यांकडे बोट दाखवले आहे. राजकारणी लोक खूप वाईट आहेत. माझ्या मुलाने चांगले आयुष्य जगावे, असे त्यांना कधीच वाटले नाही. त्यांना तो कायम गुन्हेगारीत राहावा असेच वाटते. त्यांना भीती होती की, नीलेश आणि त्याचा भाऊ जर राजकारणात आले, तर अनेकांचे राजकीय गणित बदलून जाईल, असा त्यांचा आरोप आहे. मी त्याची आई आहे. मी खोटे बोलणार नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाने गुन्हा करावा असे वाटते? आम्हाला फक्त शांततेने जगायचे होते. पण काही लोकांनी आम्हाला तसे करू दिले नाही. आजही आमच्यावर अन्यायचे सावट असल्याचा दावा त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नीलेश घायवळविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असले तरी त्याच्या मागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याचे बोलले जाते. त्याच्या परदेशात पळून जाण्याच्या घटनेनंतर अनेकांनी असा आरोप केला होता की, काही नेत्यांच्या दबावाखालीच पोलिसांनी सौम्य कारवाई केली. आता मात्र घायवळ कुटुंबाचा दावा आहे की, ज्यांनी त्याला आधी पळवून नेले, तेच आता त्याच्यावर कारवाई करा असे सांगत आहेत.

