पुणे-कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ याचा लहान भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याच्या प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहे. या वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “योगेश कदम यांनी शिफारस केली तरीही पोलीस आयुक्तांनी त्यांना अद्याप कोणताही शस्त्र परवाना दिलेला नाही, अशी माहिती मला स्वतः पोलिस आयुक्तांनी दिली आहे.” तसेच, चुक असेल त्यावर रितसर कारवाई करावी, कोण कोणत्या गटाचा, पक्षाचा , कुणाबरोबर फोटो असे काहीही बघू नका अशा सूचना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.जर या प्रकरणात कोणत्याही राजकारण्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच शस्त्र परवान्यासाठी जर कोणाची शिफारस आली, तर त्याची वस्तुस्थिती तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यानंतरही एखाद्या राजकारण्याने दबाव टाकून शस्त्र परवाना देण्याची मागणी केली, तर तो नक्कीच दोषी ठरेल. असही पवार यावेळी म्हणाले.
पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या संदर्भात विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, मी स्वतः पोलिस आयुक्तांना सांगितले आहे, कोण कोणत्या पक्षाचा, कोणाचा कार्यकर्ता, कोणाच्या जवळचा आहे, हे काहीही बघायचे नाही. ज्याने कायदा हातात घेतला असेल, नियम मोडले असतील, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत, आणि या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.
कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर राज्यभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महायुतीतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नीलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.
कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणी मंत्री, कार्यकर्ता, किंवा कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हा केला असेल तर शिक्षा होणारच. पुण्यात गुंडगिरी वाढू देणार नाही. सरकार कोणाचेही असो, कायदा आणि पोलिस त्यांचे काम निष्पक्ष राहिले पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्यासाठी शिफारस केली होती, असा आरोप होत आहे. यावर अजित पवार म्हणाले की, मला सांगितले गेले की काही लोकांनी शिफारस केली होती, पण पोलिस आयुक्तांनी शस्त्र परवाना दिला नाही. आणि मी त्यांचे कौतुकच केले. कारण कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. पुण्यातील असो, बाहेरच्या महाराष्ट्रातील असो, गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतही हा विषय आला होता, आणि सर्वांची भूमिका एकच होती, दोषींवर कोणतीही माया नाही.
अजित पवारांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी निर्णय घेऊ नयेत. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करायची, एवढेच काम आहे. शिफारस कोणाची आहे हे गौण आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या 32 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी नेहमी सांगतो, एखाद्या फाईलवर माझी शिफारस असली, तरी जर ती वस्तुस्थितीला धरून नसेल, तर सचिव किंवा पोलिसांनी लक्षात आणून द्यावे. जर तरीही चुकीच्या शिफारशीवर निर्णय झाला, तर तो मंत्री दोषी ठरेल. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे आता योगेश कदम यांच्या भूमिकेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नीलेश घायवळशी संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला होता. या संदर्भात विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, कोण काय म्हणतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण फोटो आहेत म्हणून संबंध आहेत, असे म्हणता येत नाही. आजच्या काळात प्रत्येकजण मोबाईलने सेल्फी घेतो. पण तपास करताना जर फोन रेकॉर्ड, संभाषण, किंवा आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळाले, तर नक्कीच कारवाई होईल.
पिंपरी चिंचवड मधील आझम पानसरे यांच्या सांगण्यावरून पूर्वी चुकीच्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिला गेला होता. मला कळल्यावर मी त्याला लगेच बाहेर काढले. अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी आम्ही नेहमी उभे राहू, पण ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही, असे अजित पवार म्हणाले. पासपोर्ट, परवाना आणि चौकशी सर्व होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. घायवळला पासपोर्ट कोणी दिला, शिफारस कोणी केली, याचीही चौकशी सुरु आहे. काहींनी शिफारस केली पण परवाना मिळाला नाही, असे मला सांगण्यात आले. तरीही जर प्रतिकूल मत असतानाही परवाना दिला असेल, तर त्या निर्णयावर स्वाक्षरी करणारा अधिकारी किंवा मंत्री दोषी ठरेल. त्या दिशेने चौकशी चालू आहे.
नीलेश घायवळ आणि त्याच्या भावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही ते राजकीय पातळीवर सक्रिय असल्याचे आरोप आहेत. यावर अजित पवार म्हणाले, राजकारण हे सेवेसाठी आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना यात स्थान नाही. कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण दिले जाणार नाही. महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोथरूड गोळीबारानंतर घायवळ टोळीविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. नीलेश घायवळ सध्या परदेशात फरार असून, त्याच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृह विभागात तपास सुरू आहे.

