पुणे: कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि पिस्तूल परवान्यामुळे चर्चेत आलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह इतर सात जणांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील १० सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या पंधरा दिवसांत नीलेश घायवळविरुद्ध दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे.
या प्रकरणी एका व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ ते २०२३ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड परिसरातील एका इमारतीचे बांधकाम करत होते. त्यावेळी आरोपी नीलेश घायवळ व त्याच्या साथीदारांनी तेथे येऊन त्यांना धमकावले. नीलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही काम होऊ शकत नाही,’ असे सांगून त्यांनी बांधकाम थांबवले आणि नंतर सदनिका देण्याची मागणी केली. तक्रारदारांनी त्यावेळी पोलिसांत दाद मागितली नव्हती.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि ते इतर व्यक्तींना भाड्याने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भाड्याची रक्कम बापू कदम नावाच्या व्यक्तीद्वारे नीलेश घायवळला दिली जात असल्याचेही नमूद केले आहे. नीलेश घायवळविरोधात तक्रारी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतरच ही तक्रार समोर आली असून, त्यावरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आहे.
नीलेश घायवळ सध्या परदेशात असून, त्याचे शेवटचे लोकेशन लंडनमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या पुणे आणि जामखेड येथील घरांवर छापेमारी करून कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र, घायवळ कुटुंब सध्या फरार असल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

