रहदारीचा रस्ता उपलब्ध करून न दिल्याने पीएमआरडीएने थांबविली बांधकामे
पिंपरी : सदनिकाधारकांना अपेक्षित रस्त्यासह इतर महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे माण (ता. मुळशी) भागातील २ विकासकांची बांधकामे थांबविण्याचे निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी दिले आहे. खाजगी सदनिकाधारकांच्या प्राप्त तक्रारीनंतर विकास परवानगी विभागाने केलेल्या स्थळ पाहणीच्या अहवालानंतर संबंधित निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी पाठक रोड, माण भागातील रहिवास गृहप्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांच्या आम्हाला गृहप्रकल्पात येण्या – जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याच्या तक्रारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केल्या होत्या. याची दखल घेत महानगर आयुक्त यांच्या निर्देशानुसार विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गृहप्रकल्पांची स्थळ पाहणी करण्यात आली. यानंतर संबंधित नागरिक आणि विकासकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत अटी शर्तीनुसार नागरिकांना गृहप्रकल्पात येण्या – जाण्यासाठी व्यवस्थित वापरण्याजोगा रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २ विकासकांची बांधकामे थांबविण्यात आली आहे. यात जॉयव्हिले शापूर्जी हाऊसिंग प्रा. लि., मे. येलोस्टोन स्कायस्क्रेपर्स एलएलपी या विकासकांची कामे थांबविण्यात आली आहे.
अतिक्रमणधारकांवर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश
मुळशी तालुक्यातील भुगाव येथील ‘द वन सहकारी गृहरचना संस्था मर्या’ या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्त्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांना येण्या – जाण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी पीएमआरडीएकडे आल्या होत्या. त्यानुसार स्थळ पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी अतिक्रमणे आढळून आल्याने संबंधित अधिक्रमणधारकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी दिले आहे.

