पुणे-कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू असून, 18 ठिकाणी झडती घेण्यात येत आहे. या कारवाईत महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा सहभागी आहेत. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आणि देशभरातही खळबळ उडाली आहे.
कोंढवा परिसरात यापूर्वीही अशाच स्वरूपाची कारवाई झाली होती. दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या तिघांना पुणे पोलिसांनी याच भागातून अटक केली होती. त्या कारवाईनंतर देशातील मोठा संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात पोलिसांना यश आले होते. आता पुन्हा एकदा त्याच भागात संयुक्त कारवाई सुरू असल्याने तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोंढवा आणि आसपासच्या भागात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासून शोधमोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती घेतली जात आहे. परिसरात सुरक्षा तसेच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

