५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ८ : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध आणि पुणे महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्ह्यात रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.
‘पोलिओमुक्त भारत’ या उद्दिष्टासाठी सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे ग्रामीण ५ लाख ६ हजार ८०९ जिल्हा रुग्णालय औंध येथे भागातील शहरी ६९ हजार ६९० एकूण लाभार्थी ५७ लाख ६ हजार ४९७ बालकांचे पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण पोलिओ लसीकरणासाठी ४ हजार २२३ पोलिओ लसीकरण केंद्र (बूथ) आणि याकरिता आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका असे एकूण १० हजार ३१८ कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था सहभाग घेण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत वंचित राहिलेल्या सर्व बालकांचे १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. लसींचा पुरेसा साठा व वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पालक, स्वयंसेवक, सुजाण नागरिक, समाजसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. हंकारे यांनी केले आहे.
श्री. गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे: ‘आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही आदर्श आणि जबाबदार पालक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. या मोहिमेत एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याकरिता आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे.’
000

