पुणे-शहरात गुटखा बंदी असूनही छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी पानपट्टी आणि किराणा दुकानात होणाऱ्या गुटखा विक्रीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारींनुसार, शहरातील पानपट्टी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थांची आणि गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.राज्यात गुटखा बंदी लागू असली तरी, परराज्यातून छुप्या मार्गाने गुटखा शहरात आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. उपनगरातील गोदामांमध्ये गुटख्याचा साठा करून तेथून शहरातील छोट्या दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. यापूर्वी पोलिसांनी महामार्गावर गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती, मात्र तरीही छुप्या पद्धतीने विक्री सुरूच असल्याचे दिसून आले आहे.या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा नागरिकांना गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांना गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गुटखा विक्रीबाबतची माहिती डायल ११२ किंवा १०० या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, जेणेकरून नागरिक निर्भयपणे माहिती देऊ शकतील.

