मुंबई- महापालिका रुग्णालयांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस उघड होत असून, महापालिकेचा 7 हजार कोटी रुपयांचा आरोग्य विभागाचा निधी नेमका जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज विलेपार्ले येथील आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा आणि कर्मचारीसंख्येची कमतरता पाहून त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला.
भेटीदरम्यान गायकवाड यांच्यासोबत माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर, अशरफ आझमी, अवनीश सिंग, सुरेशचंद्र राजहंस, जयकांत शुक्ला यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड, औषध वितरण केंद्र, प्रयोगशाळा आणि आपत्कालीन विभागाची पाहणी केली.

यानंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या की, कूपर रुग्णालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय आहे. रुग्णांसाठी योग्य सुविधा नाहीत, औषधांचा तुटवडा आहे, कर्मचारीसंख्या अपुरी आहे आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छतेमुळे रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून, गेल्या दोन महिन्यांत सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत.
खासदार गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेकडे दरवर्षी आरोग्य विभागासाठी 7 हजार कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला जातो. मात्र, या निधीतून रुग्णालयांना काहीच मिळत नाही. औषधे नाहीत, उपकरणे बिघडलेली आहेत, आणि रुग्णांना बेडसाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. हा निधी नक्की खर्च होतो कुठे? ही चौकशी व्हायला हवी. त्यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले की, भाजप-महायुती सरकार आणि बीएमसी प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर एक प्रकारचा गुन्हा आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांना सरकारी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. त्यांचा विश्वासच आता उडाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
गायकवाड यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी कुर्ला, वांद्रे, गोवंडी आणि घाटकोपर येथील उपनगरी रुग्णालयांनाही भेट दिली होती. सर्वत्र एकच चित्र दिसते, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता आणि रुग्णांची अमानुष अवस्था. प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिकेच्या रुग्णालयांची दुरवस्था करून त्यांच्या खासगीकरणाचा डाव सरकार खेळत आहे. बीएमसीच्या माध्यमातून चालणाऱ्या आरोग्य यंत्रणेला जाणीवपूर्वक दुर्बल बनवले जात आहे, जेणेकरून खासगी हॉस्पिटल्सना फायदा मिळेल. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. सार्वजनिक आरोग्य ही सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे. त्याचे खासगीकरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला.
गायकवाड यांनी सांगितले की, या सरकारमध्ये थोडीशी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी तत्काळ सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची भरती त्वरित सुरू करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडू. त्यांनी शेवटी असा इशाराही दिला की, बीएमसी आणि राज्य सरकारकडून जर मुंबईकरांच्या आरोग्याशी केलेली ही प्रतारणा सुरूच राहिली, तर काँग्रेस मुंबईभर तीव्र आंदोलन उभारेल. गरीब आणि रुग्णांच्या बाजूने आम्ही ठाम आहोत.

