मुंबई-आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मोठं काहीतरी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत.
नरेंद्र मोदी आज मुंबईतील भाजप आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधणार असल्याची महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. मुंबईतील राजभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईतील भाजप आमदार, खासदार तसेच मंत्री या बैठकीत उपस्थित असणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मंत्री, आमदार, खासदारांना महत्त्वाचा कानमंत्र देणार आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. मुंबई म्हटलं की ठाकरेंची शिवसेना असं समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. मुंबई म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे, अशी भावना इथल्या मराठी माणसांची आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावण्यात भाजपला यश आलं. शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. यानंतर कोर्टात, निवडणूक आयोगात प्रकरण गेलं. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता गेली. पक्षदेखील बऱ्यापैकी गेला. पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील ठाकरेंकडे राहिलं नाही. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई महापालिका काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजप मोठी रणनीती आखत आहे.भाजपने गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेला टफ फाईट दिली होती. पण शिवसेनेचाच महापौर मुंबई महापालिकेत बसला होता. पण यावेळी भाजप मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी जंग जंग पछाडणार आहे. त्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मुंबईत देण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपला आशा लागली आहे.

