पुणे-संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत (UNGA) सहभागी होण्यासाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या नुकत्याच न्यूयॉर्कला रवाना झाल्या.
भारतीय संसदीय दलाची सदस्य म्हणून या महत्त्वाच्या जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक शांतता, सहकार्य आणि विकासावर होणाऱ्या चर्चांमध्ये भारताची सार्थक भूमिका आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी आहे. मला ही संधी प्रदान केल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे विविध देशांमध्ये यापूर्वीच पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता अमेरिकेने लादलेली नवीन टेरिफ नियमावली, एच वन बी व्हिसा संदर्भातील अन्यायकारक तरतुदी, भारतीय उपखंडामध्ये असलेली अस्थिर परिस्थिती, त्याचप्रमाणे रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती अशा विविध घटकांमुळे भारताच्या राजनैतिक क्षमतेचा कस लागत आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाकडून मांडण्यात येणाऱ्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर राज्यसभा खासदार या नात्याने मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक २०२५ संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये मेधा कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीमधील चर्चेदरम्यान अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता

