मोटार,पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, महागडे फर्निचर देखील जप्त
पुणे- पोलिसांनी आता गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि घायवळ गँगचा नीलेश घायवळ यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता पोलिसांनी टिपू पठाण टोळीवर बडगा उगारला आहे.हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्याने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांना गोठवले असून, संबंधित अनधिकृत बांधकामे तोडण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी टिपू पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) हा आपल्या साथीदारांच्या मदतीने नागरिकांना फसवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करत होता. त्याने हडपसर परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर इमारती उभ्या करून त्या मालमत्तांचे खोटे दस्तऐवज तयार केले. त्याच्या टोळीत सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख आणि मुनीर शेख यांचा समावेश आहे. या सर्वांच्या बँक खात्यांना पोलिसांनी गोठवले असून, संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी टिपू पठाणच्या नावावरील एक महागडी मोटार जप्त केली असून, त्याचे घर आणि कार्यालयांची सखोल झडती घेतली आहे. तपासादरम्यान पोलिसांना पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, महागडे फर्निचर आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या आहेत.
झडतीदरम्यान पोलिसांनी टिपू पठाणच्या घरातून दोन नोटरीकृत साठेखत आणि जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपींच्या नातेवाइकांकडे या वस्तूंची कोणतीही बिले अथवा खरेदीची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे या सर्व वस्तू अवैध मार्गाने मिळवल्याचा पोलिसांना संशय आहे. याच अनुषंगाने टिपू पठाण व त्याच्या साथीदारांवर भ्रष्टाचार, आर्थिक फसवणूक आणि बेकायदा बांधकामाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचे कलम लागू करण्यात आले आहेत. काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने या टोळीने उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई करत ती बांधकामे पाडून टाकली. या कारवाईनंतर परिसरातील इतर बेकायदेशीर इमारतींची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, टिपू पठाण टोळीने बेकायदेशीर बांधकामांमधून नागरिकांकडून लाखो रुपयांची उकळपट्टी केली होती. काही नागरिकांना खोट्या आश्वासनांवरून घरे विकण्यात आली. संबंधित दस्तऐवज बनावट ठरल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. टोळीतील सदस्यांनी काही गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमेची वसुली केल्याचंही उघड झाले आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी अशाच प्रकारे आंदेकर आणि घायवळ गँगविरोधातही कारवाई करत त्यांच्या मालमत्ता व बँक खाती गोठवली होती. आता टिपू पठाणविरोधात घेतलेली ही कारवाई शहरातील गुन्हेगारी संघटनांना मोठा धक्का देणारी ठरत आहे.
दरम्यान, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या कारवाईचा तपास पुढे वाढवून टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. आरोपींकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे काही सरकारी अधिकाऱ्यांशी असलेले संबंधही तपासले जाण्याची शक्यता आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणाशी संबंधित कंत्राटदार, दलाल आणि इतर संबंधित व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केलं आहे की, शहरात कोणत्याही गुन्हेगारी टोळीला मोकळीक देण्यात येणार नाही. बेकायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा, बांधकामं आणि संपत्ती जप्त केली जाईल. या कारवाईनंतर हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

