मुंबई: शिवसेना पक्षचिन्ह वादावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सुनावणीसाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे पुढील तारीख मागितली. सिब्बलांच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिली.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह “धनुष्यबाण” आणि पक्षनाव “शिवसेना” हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याआधी न्यायालयाने या प्रकरणावर काही प्राथमिक सुनावण्या घेतल्या असून, आता अंतिम टप्प्याकडे सुनावणी पोहोचत आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाच्या चिन्हावरील सुनावणीवर वकील असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शंका व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले की, “शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी कधी पूर्ण होईल ? असे प्रश्नचिन्ह आहे..”
त्याचवेळी, ही सुनावणी पुढे ढकलली जावी, यासाठी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे प्रयत्न होतीलच, अशी शक्यताही असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.

