मुंबई-सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला ही केवळ एक घटना नसून, एक सूचक संदेश असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दिला. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीलाही जातीच्या आधारावर निशाणा बनवण्यात येत असेल, तर पुढील नंबर दलित आयएएस अधिकारी, डॉक्टर्स व सरकारी अधिकाऱ्यांचा असू शकतो, अशी भीती त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशाच्या न्यायव्यवस्थेत एकच खळबळ माजली आहे. सर्वच लहानथोर नेत्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वरील भीती व्यक्त केली आहे. जातीवर आधारित अत्याचार हा एकेकाळी केवळ गावांपुरते मर्यादित असलेले क्रूर वास्तव मानले जात होते. तिथे जातीव्यवस्था उघडपणे व हिंसकपणे लागू केली जात असे. शहरातील भेदभाव एक मूक मुखवटा घातलेला होता. कार्यालये, रुग्णालये व सरकारी कार्यालयांच्या भिंतींमध्ये लपला होता.
पण आता असे नाही. सरन्यायाधीश गवई यांच्यावरील अलिकडे झालेला हल्ला हा जातीभेद आता चार भिंतीमधून बाहेर पडल्याचा स्पष्ट पुरावा आहे. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीलाही जातीच्या आधारे लक्ष्य केले जाऊ शकते, तेव्हा दलित आयएएस अधिकारी, डॉक्टर व सरकारी अधिकाऱ्यांसाठी याचा काय अर्थ होतो? पुढचा नंबर आयएएस अधिकारी, डॉक्टर व सरकारी अधिकारी असू शकतात. त्यामुळे ही फक्त एक घटना नाही. हा एक संदेश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकरांनी यापूर्वीही सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. भारताच्या सरन्यायाधीशांवरील या भयानक हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. भारतीय समाजाला खरोखरच प्रगती करायची असेल, तर त्यांना उच्च पदांवर असलेल्या शूद्र आणि अतिशूद्रांबद्दल खोलवर रुजलेले जातीय पूर्वग्रह सोडून दिले पाहिजेत. ज्ञान, शहाणपण आणि नेतृत्व हे केवळ सनातनी किंवा तथाकथित उच्चवर्णीयांचे अधिकार क्षेत्र नाही.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या अन्य एका ट्विटद्वारे बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीचे नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली आहे. बिहारमधील इंडिया आघाडीने हेतुपुरस्सर दलित नेतृत्वाला निवडणुकीपासून दूर ठेवले. यामुळे आगामी निवडणुकीत या आघाडीला नुकसान होऊ शकते. लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीने मूर्खपणा केला नसता, वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवले नसते, तर आज भाजप केंद्रात नसती. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनुवाद व सनातनवादाला प्रोत्साहन दिले आहे. आरएसएसची निष्ठा ही देशाप्रती नाही, तर सनातनवादाप्रती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

