मुंबई-शिवसेना पक्षचिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सूचीबद्ध असल्याने सुनावणीसाठी नक्कीच येणार आहे, मात्र सुनावणी आजच पूर्ण होईल का, यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. कारण, जस्टीस सूर्यकांत इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा सदस्य न्यायाधीश आहेत.. त्यामुळे आज यावर सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे मत वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. तसेच एकनाथ शिंदेंकडून ही सुनावणी पुढे ढकलली जावी, यासाठी प्रयत्न होतील, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह “धनुष्यबाण” आणि पक्षनाव “शिवसेना” हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याआधी न्यायालयाने या प्रकरणावर काही प्राथमिक सुनावण्या घेतल्या असून, आता अंतिम टप्प्याकडे सुनावणी पोहोचत आहे.
शिवसेना पक्षाच्या चिन्हावरील सुनावणीवर वकील असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शंका व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? असे प्रश्नचिन्ह आहे..”
त्याचवेळी, ही सुनावणी पुढे ढकलली जावी, यासाठी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे प्रयत्न होतीलच, अशी शक्यताही असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज हे प्रकरण सुनावणीला आले तरी, अंतिम युक्तिवाद पूर्ण होऊन निकाल येईल की नाही, याबद्दल अनिश्चितता कायम आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.उद्धव ठाकरे गटाने जुलै महिन्यातच न्यायालयात याचिका दाखल करून “शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकर निर्णय द्या” अशी मागणी केली होती. त्यावर त्यावर 14 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असे सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. आता आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी अंतिम निर्णयासाठी येत आहे.

