डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू-मुंबईसह देशभरात एकूण 15 ठिकाणी ही छापेमारी
मुंबई: ईडीने सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मोठी कारवाई करत ८ ठिकाणी छापेमारी केली आहे. सलीम डोला हा दाऊद इब्राहिमचा सहकारी असून, संशय आहे की त्याच्या माध्यमातून ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत होता. छापेमारीदरम्यान महत्वाचे दस्तऐवज आणि काही निधी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या सलीम डोलाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज पहाटेपासून मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई झोन वनच्या ईडी पथकाकडून मुंबईसह देशभरात एकूण 15 ठिकाणी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान ड्रग्ज तस्करी मधील मोठं नाव असलेला सलीम डोला सध्या भारताबाहेर आहे. मात्र, त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची तस्करी सुरू होती. या प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे. डोला हा दाऊद टोळीशी संबंधित असून, त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत.
ईडीकडून मुंबईतील डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. मुंबईत एकूण आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्याशी संबंधित डोंगरी येथील ठिकाणांवर ईडीचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणा सध्या डोलाच्या मागावर असून, त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मुंबई व्यतिरिक्त नवी दिल्ली आणि गुरुग्राम (गुरगाव) येथेही आज पहाटेपासून छापे मारी करण्यात आली. देशभरातील एकूण 15 ठिकाणी ही कारवाई झाली. ड्रग्ज विक्रीतून मिळालेला पैसा मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून फिरवल्याचा ईडीला संशय आहे. या कारवाई दरम्यान बनावट कॉल सेंटर प्रकरणीही तपासणी सुरू असून, डिजिटल पुरावे गोळा करण्यावर तपास यंत्रणांनी भर दिला आहे.

