पुणे – बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकले. त्यानुसार मराठवाड्यातील लाडक्या बहिणींनाही एकगठ्ठा 6 हप्ते मदत म्हणून द्यावेत, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 6 महिन्यांचे हप्त एकगठ्ठा द्यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
उद्धव ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. तिथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मागणी केली. ते म्हणाले, मराठवाड्यात गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. तेथील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ मदतीची गरज आहे. सत्ता असो किंवा नसो शिवसेना तुमच्या मदतीसाटी आहे. पण ज्या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी सध्या सापडला आहे, त्यांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे पैसे एकदाच टाकण्यात आले. त्यानुसार आत्ताही 6 महिन्यांचे हप्ते एकाचवेळी द्या. सध्या पूरस्थितीत लाडक्या बहिणींना या पैशांची नितांत गरज आहे.
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी तेथील महिलांच्या खात्यांत 10 हजार रुपये टाकले. त्या ठिकाणी निवडणूक आहे म्हणून त्यांनी तसे केले. पण महाराष्ट्रात अशी मदत का केली जात नाही? असा सवाल उद्धव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, या देशातील उद्योगपतींनी हजारो कोटींचे कर्ज काढले. त्यानंतर त्याची परतफेड न करता ते पळून गेले. नंतर या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. याऊलट शेतकरी कर्ज काढून कधीच पळून जात नाही. ज्यावेळी आपण काढलेले कर्ज फेडू शकत नाही, असे त्याला वाटते तेव्हा तो आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतो. पण तरीही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मदत करावी. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जावे.

