मएसो सीनियर कॉलेज ग्रीन क्लबच्या आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने उपक्रम
पुणे: मएसो सीनियर कॉलेजच्या ग्रीन क्लबच्या पुढाकाराने आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने पुनर्वापर संकल्पनेवर आधारित माती दान उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी माती दान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने जलाशयांमध्ये गाळ निर्माण होतो. शाडू मातीचा पुनर्वापर शक्य असल्याने नागरिकांनी साधी पद्धत अवलंबावी. मूर्तीचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करावे, तयार झालेला गाळ गोळा करून कोरडा करावा आणि जवळच्या माती संकलन केंद्रात जमा करावा. ही माती नंतर कलाकारांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.
मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी ग्रीन क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळालेलं ज्ञान व अनुभव दैनंदिन जीवनातही अंमलात आणण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी कॉलेजच्या प्रा. प्रतिभा पाटील आणि आयएमसीसी कॉलेजच्या प्रा. स्नेहा गवारे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रीन क्लबने चालू शैक्षणिक वर्षातही विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे नियोजन केले असून, मएसो सीनियर कॉलेजला एक आदर्श पर्यावरणपूरक परिसर बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

