पुणे : प्रकाशक आणि विक्रेता यांच्यातील सुंदर नाते दिलीपराज प्रकाशनने जपले आहे. एका ग्रंथविक्रेत्याचा सत्कार होणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ग्रंथविक्री व्यवसायात यश मिळविण्यासाठी विक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या काळात वाचक नाही, असे सांगितले जाते; परंतु अशी परिस्थिती नाही. युवा पिढीदेखील आज वाचते आहे, फक्त त्यांचे माध्यम बदललेले असू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले.
पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने आज (दि. ३) अनिल बुक एजन्सीचे संचालक (नागपूर), ज्येष्ठ ग्रंथ वितरक अनिल टांकसाळे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण टोकेकर आणि ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी संजय भास्कर जोशी बोलत होते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या दिलीपराज प्रकाशनच्या गौरवशाली ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते.
लेखकाइतकीच वाचकांची प्रतिभा महत्त्वाची वाटते असे आवर्जून नमूद करून संजय भास्कर जोशी म्हणाले, राजीव बर्वे यांच्या पुस्तकातून त्यांनी न पाठविलेली पत्रे हा हाताळलेला वाङ्मयीन प्रकार अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे.
‘दिलीपराज’ची पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी : प्रवीण टोकेकर..
प्रवीण टोकेकर म्हणाले, अनिल टांकसाळे हे भाषासंस्कार करणारे लोभस व्यक्तिमत्त्व आहे. ‘मनातील पत्रे’ या पुस्तकाविषयी बोलताना टोकेकर म्हणाले, ही पत्रे एखाद्या दृश्याप्रमाणे उलगडत जातात. या पत्रांमधून लेखकाच्या पारदर्शक मनाचे सर्जनशील दर्शन घडते. दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी आहेत. तंत्रज्ञान बदलले तरी शब्द हे एकमेव माध्यम आहे जे बोलेल आणि लिहिले जाईल. दिलीपराज प्रकाशनतर्फे पुढील काळात तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारून कार्य घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुस्तकविक्री चळवळ म्हणूनच स्वीकारली : अनिल टांकसाळे..
सत्काराला उत्तर देताना अनिल टांकसाळे म्हणाले, मराठी वाचकाला काय हवे जाणून घेण्यासाठी मी सातत्याने ग्रंथप्रदर्शने भरवत गेलो. यातूनच पुस्तकांचे दुकान थाटले आणि व्यवसाय वाढत गेला. आजच्या सन्मानाने पुस्तकविक्रेता उपेक्षित नाही हा भाव निर्माण झाला आहे. पुस्तक विक्रीचा व्यवसाय आज संक्रमण काळातून जात आहे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहेत. आज नवे लेखक, नवे साहित्य निर्माण होत आहे, परंतु वाचक सिमित झाला आहे. पुस्तकविक्री हा व्यवसाय न समजता ती चळवळ म्हणूनच स्वीकारली आहे.
‘मनातील पत्रे’तून उत्तम मनसंवाद : उल्हास पवार..
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उल्हास पवार म्हणाले, आजच्या काळात कुटंबव्यवस्थेची वीण उसवत चालेली असताना ‘मनातील पत्रे’ या पुस्तकातील पत्रांचे महत्त्व आहे. अनेकांच्या मनातील कल्लोळ व्यक्त होत नाही परंतु राजीव बर्वे यांनी आपल्या लेखणीतून तो उत्तम प्रकारे मांडला आहे. या पत्रांमधून सप्रेम मनसंवाद व्यक्त होत असून यातील कल्पनाशक्ती, सुंदर वर्णने अंतर्मुख करणारी आहेत. विज्ञान युगामुळे पत्र लिखाण मागे पडले आहे अशा काळात कृत्रिमता नाहीशी होण्यासाठी या पत्रांचा नक्कीच उपयोग होईल. या पुस्तकातून साहित्याला वेगळा आयाम मिळाला आहे.
‘मनातील पत्रे’ : मनातील भावनांचा उद्रेक : राजीव बर्वे..
लेखनाविषयी मनेगत व्यक्त करताना राजीव बर्वे म्हणाले, पत्र लेखनाचे बाळकडू मला वडिलांकडून मिळाले आहे. मनातील भावभावना कुठल्यातरी प्रकारे बाहेर याव्यात या करिता मी लिहिता झालो. पत्र रूपाने लिखाण करण्याचे माध्यम मला आवडल्याने मनातील भावनांचा उद्रेक या पुस्तकातून वाचकांसमोर आला आहे.
स्वागतपर प्रास्ताविक मधुर बर्वे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मधुर बर्वे, मधुमिता बर्वे यांनी केले. अंजली टांकसाळे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

