पुणे-पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चोवीसवाडी येथे एका 11 वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेय फडतरे असे या मुलाचे नाव होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून लिफ्टमध्ये काही दोष आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाची अधिकची माहिती अशी की, अमेय हा लिफ्टसोबत खळत होता. जिन्याने वर जायचा आणि खाली येताना लिफ्टने यायचा. काही वेळ हा खेळ सुरू राहिला. मात्र, खेळत असतानाच लिफ्टच्या मधल्या जागेत अमेय अडकला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बराच वेळ त्याने मदतीसाठी आरडा-ओरड केली. मात्र, वेळेवर मदतीला कोणीच आले नाही. अमेय हा लिफ्टमध्ये अडकला आहे हे बराच वेळ कोणाच्याच लक्षात आले नाही.
काही वेळाने अमेय हा लिफ्टमध्ये अडकला असल्याचे लक्षात येताच याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अमेयला लिफ्टमधून बाहेर काढले व लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अमेयचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच अमेयला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याचे अनेक घटना वारंवार समोर येत असतात. यावर आळा घालणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी आपण लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी केले पाहिजे. तसेच लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जण्यापासून रोखावे. तसेच मोठी सोसायटी असल्यास एक व्यक्ती लिफ्टची ने-आण करण्यासाठी नेमण्यात यावा.

