एमआयटी डब्ल्यूपीयूत राष्ट्रपिता म.गांधी व भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
पुणे ३ ऑक्टोबरः “ राष्ट्रपिता म. गांधी यांच्या आंदोलनात हिंसा नसल्याने संपूर्ण विश्वाने त्यांना सामावलेले आहे. परंतू वर्तमान काळात डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, किंग जोन आणि चिनचे जिनपींग हे सर्व हिटलरच्या भूमिकेतच आहेत. यांच्यामुळे विभाजीत झालेल्या जगात ‘जगा आणि जगू दया’ अशा घोषणा ऐकू येत आहेत. इस्त्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युध्द व अमानुषता ही युनोच्या साक्षीनेच होत आहेत कारण असाह्य युनोच्या पायात बेड्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्वात्मक म. गांधी यांच्या विश्वशांतीच्या तत्वांची गरज भासत आहे.” असे विचार ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
मानवतेचे पूजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीने ‘स्मरण महामानवांचे’ या अभिवादन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार हे अध्यक्षस्थानी होते. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
तसेच माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड-नागरे, सौ. ललिता सबनीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, प्रसिद्ध गप्पाष्टक कार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एडीटी विद्यापीठाचा कुलसचिव डॉ. महेश चोपडे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बाहेर देशात गेल्यावर भगवान गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावांचा उल्लेख करतात. परंतू देशात म. गांधी यांच्या नावाने गलिच्छ राजकारण चालले आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य जरी असले तरी या देशात मारेकरी हे देशभक्त ठरत आहेत ही सर्वात मोठी शोकांतीका आहे.”
“सत्याचे सातत्य टिकविणारे म. गांधी हे वंचितांसाठी सेवा व समर्पण, द्वेष आणि हिंसेला उत्तर देणारे, प्रेम आणि बंधुता, साध्य व साधन मधील विवेक बाळगणारे आणि हिंसेला अहिंसेने उत्तर देणार होते.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवत जीवनाचे तत्व आहे. सर्व धर्म ग्रंथ हेच जीवन ग्रंथ आहेत हे म. गांधींनी ओळखून सतत शांतीच्या दिशेने वाटचाल करीत होते. संपूर्ण जगात भारताची ओळख गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावाने ओळखले जाते. आज संपूर्ण जगात वाढत जाणार्या अशांत आणि हिंसेला उत्तर म्हणजे म. गांधी यांनी दिलेला शांतीचा संदेश आहे.”
डॉ. उल्हास पवार म्हणाले,“ संयम आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवले तर म. गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री या दोघांची जयंती खर्या अर्थाने साजरी केली असे म्हणू शकतो. कस्तूरबा गांधी यांनी अफ्रिकेत म. गांधी यांना असहकाराचा पहिला धडा दिला. तसेच मानवता, समता व नैतिकता या तीन पायांवर संघर्ष उभा राहण्याचे तत्व न्या. रानडे यांनी म. गांधी यांना दिले. त्याच प्रमाणे लाल बहाद्दूर शास्त्री यांचे साधेपण आणि आचरण या तत्वाचे पालन ही संपूर्ण देशाने केले. अहंकारातून हिंसा आणि शत्रू निर्माण होतात त्यामुळे अहंकार सोडण्याचे तत्व या दोघांनी संपूर्ण मानवजातीला दिले आहे.”
डॉ. सुचित्रा कराड नागरे म्हणाल्या,“या वर्षी नैसर्गिक आपत्ती पाहता शेतकरी व जवानांसाठी पुन्हा जय जवान, जय किसान नारा देण्याची वेळ आली आहे. शांती हीच खरी ताकद असून भारत एकमेव देश असेल जो संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवेल.”
विद्यार्थी आयशी बासू, दिप्ती मिश्रा, निष्ठा मांडलिया, दिव्या थोरवे, कोमल नेवसे, खुशबू अवस्थी, शैलजा इनामदार यांनी आपल्या भाषणातून म.गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांनी सत्य, अहिंसा, शांती आणि मानवकल्याणासाठी केलेल्या कार्यावर विस्तृत विवेचन केले.
डॉ. रत्नदीप जोशी यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

