सदाशिव पेठेतील नवा विष्णू चौक मित्र मंडळ, नवरात्र उत्सव, सदाशिव पेठ तर्फे विशेष मुलांच्या मातांचा सन्मान
पुणे : आयुष्य हे एक आव्हान किंवा संकट असते, तेव्हाच ते खरे आयुष्य म्हणावे. जे संकट आपल्यावर आलेले असते त्यापलीकडे दुसरे संकट शोधा ; त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग दिसू लागतात. जेव्हा तुम्ही वंचितांचे जग पाहता, तेव्हा तुमचा अहंकार संपून जातो. संकटांतूनच आयुष्याचे खरे धडे मिळतात, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक मित्र मंडळ, नवरात्र उत्सव, सदाशिव पेठ तर्फे विशेष मुलांच्या मातांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पूनम गांधी, गौरी तुपे, वैशाली सुरगुडे, पल्लवी सोनाकुल, मालन पवार, मंदा पवार, मनीषा कांबळे, श्वेता कांबळे, कार्याध्यक्ष कुमार रेणुसे, तेजस घोडके, अमित सुरगुडे, गणेश जंगम, सचिन खंडाळकर, रवींद्र गांधी, पांडुरंग ढाकूळ, धीरज वाघेरे, अरुण राठोड, संतोष राठोड, मंगेश सानप, दीपक प्रजापति हे उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाचे उपरणे अशा स्वरूपात सन्मान करण्यात आला.
रेणू गावस्कर पुढे म्हणाल्या, या मातांचा सन्मान करताना समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगताना आपल्या दुःखांपेक्षा इतरांचे दुःख पाहिले, तर नक्कीच मार्ग मिळतो. गरजूंना फक्त सहानुभूती देण्यापेक्षा आपुलकी अधिक महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.
कुमार रेणुसे म्हणाले, मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान केला जातो. अनाथाश्रमात मुलांचे संगोपन करणाऱ्या माता असोत किंवा ससून रुग्णालयातील लहान मुलांची काळजी घेणाऱ्या परिचारिका यांचा सन्मान आम्ही केला आहे. यंदा विशेष मुलांच्या मातांचा गौरव करण्यात आला. विशेष मुलांची जबाबदारी सांभाळणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असते, असे त्यांनी नमूद केले. प्रा.संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर हेमंत मावळे यांनी आभार मानले.

