मुंबई: महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यात मध्य प्रदेशने आघाडी गाठली आहे, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चढता आलेख
प्रकार दाखल पीडित
हत्या १९० १९६
हत्येचा प्रयत्न ८५ ८७
छेडछाड ६१ ६१
अपहरण १० १०
बलात्कार ४ ४
चोरी १,२४३ १,२४३
खंडणी २९ २९
जबरी चोरी ३२६ ३२७
दरोडा ११ १३
फ्रॉड ८६३ ८६६
एनसीआरबीने २०२३मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७,८८६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ५ हजार ११५ गुन्ह्यांची नोंद आहे. पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश (५,७३८) आहे. २०२३मध्ये राज्यात १९० वृद्धांंच्या हत्येची नोंद केली आहे. दरोड्याच्या ११ घटना समोर आल्या, तर वृद्धांंना लक्ष्य करत चोरीचे १,२४३ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या ३२६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वृद्धांंच्या विनयभंगाच्या ६१, तर बलात्काराचे ४ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत. एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे.
मुंबईत ५१८ गुन्हे नोंद झाले आहेत. २०२२मध्ये हाच आकडा ५७२ होता, तर २०२१ मध्ये ९८७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली होती. दिल्ली (१,३६१), कर्नाटक बंगळुरू (६४९) नंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत ५ हत्याची नोंद झाली झाली. दोषारोपपत्र दर ३८.५ टक्क्यांवर आला आहे.
घरात एकट्या असलेल्या वृद्धांना घरातल्या रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणून देण्यासाठी पोलिस पुढाकार घेताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी – आजोबांची माहिती पोलिस दप्तरी नोंद आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठीसह त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलिस मदतीसाठी धावून जात आहेत.

