पुणे-जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रावणगाव येथील रानमळा वस्ती परिसरात काल थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली . पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि काही वेळातच राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन स्वत:ने आत्महत्या केली. खून झालेल्या पत्नीचं नाव जयश्री अशोक गावडे (वय 45) असून तिच्या खुनानंतर पती अशोक मारुती गावडे (वय 50) याने देखील आत्महत्या केली. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली असून या अनपेक्षित घटनेनं गावकऱ्यांना धक्का बसला आहे. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यापश्चात दोन मुले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दसरा सणाच्या पूर्वसंध्येला, घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर काही वेळातच एका शेतकर्याची अशोक यांनी राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पती-पत्नीतील कौटुंबिक वाद हा प्राथमिक अंदाज आहे. दौंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक व जयश्री हे साधे-सरळ आयुष्य जगत होते. मात्र, घरगुती कारणावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे. दसऱ्यासारख्या मंगलदिनी अशी शोकांतिका घडली, याची हळहळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं.

