मुंबई :”मला असं वाटतं की, कदाचित मोहन भागवत यांना सांगता येत नसेल. आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला तर ब्रह्मराक्षस झालेला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “मी मुद्दामून तुम्हाला सांगतो, ब्रह्मराक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जावून गूगलवर ब्रह्मराक्षस हा शब्द बघा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज दसरा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारतोय की, भागवत साहेब हे तुमचे चेले चपाटे, अहो 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान झालंय का, ज्या कामासाठी संघाने 100 वर्ष मेहनत केली, त्या मेहनतीला आज लागलेली विषारी फळं, ही फळं पाहिल्यावर तुमचं समाधान होतंय का, तुम्हाला आनंद मिळतोय का, याचसाठी केला अट्टाहास, ही विषारी फळं त्या झाडाला लागलेली आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“आमच्या अंगावर हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवत यांची गेल्या काही वर्षांपासूनची वाक्य आहेत. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यांनी हिंदू-मुस्लीम यांच्यातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत, त्यांना विचारतोय, मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडलं हे बोलायची तुमची हिंमत आहे का? 2022 ची बातमी आहे की, मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर मुसलमानांचे सर्वोच्च नेते उमर अहमद इलासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा की, ते हिंदुस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले की पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले”, असंही ते म्हणाले.”आमच्या अंगावर येता? अरे तुम्हाला लाज, लज्जा, शरम आहे की नाही? एकतर काहीतरी ठरवा. अमिबा यासाठीच बोललो की, ना आकार ना उकार. कसाही वाढतोय आणि कसाही पसरतोय. हे एवढ्या पुरता थांबत नाही. मोहन भागवत बोलले आहेत, या देशात राहतो तो प्रत्येकजण हिंदू आहे. मग त्यांचे चेले चपाटे करत आहेत हिंदू-मुस्लीम करत आहेत. आम्ही परत सांगतो, हा देश जो स्वत:चा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी यांना भाजपवाले पाकिस्तान्यांचे दहशतवाद्यांची बहीण म्हणाले होते. ती सोफिया कुरेशी आमच्या सगळ्यांती बहीण आहे हे आमचं हिंदुत्व आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं.”काहीतरी दिशा ठरवा. कुठे जायचं ते ठरवा. कारण एकीकडे तुम्ही सोफिया कुरेशा यांना तुम्ही पाकिस्तान्यांची बहीण म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांची स्वागत मिरवणूक काढत आहात त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत की, मुस्लिम महिलांकरुन रक्षाबंधन करुन घ्या. नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहेत. नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वत:चं तपासून घ्या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहात. आशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धा बरोबर करतो तो माणूस बेशरम आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
जीवाला जीव देणारी माणसं हेच खऱ्या आयुष्याचं सोनं असतं. म्हणूनच अनेक पक्षांचा आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. त्यांना असं वाटलं की, काही जणांना त्यांनी पळवलं आहे, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याचकडे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आता घरुन येताना मी आजूनबाजून पाहत होतो. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाल टाका, गाढव ते गाढवच. जसा संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शाह यांच्या जोड्यांचं भार वाहणारं हे गाढव. जाऊद्या त्यांचे जोडे त्यांना लखलाभ. जनता पण मारणार एकदिवस, तो दिवसही लांब नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.”शेतकऱ्याच्या घरादाराचं चिखल झालं आहे. शेती वाहून गेली आहेच, पण घरादारातही चिखल झाला आहे. शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय, ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. मराठवाडा आपत्तीग्रस्त झाला आहे. मी शिवसैनिकांना आवाहन करतो. हे संकट फार मोठं आहे. जे करता येईल ते फूल नाहीतर फुलाची पाकळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देऊ. ते करायला पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.”माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा. आता ते मुख्यमंत्री असताना बोलत आहेत की, ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. सगळे निकष बाजूला ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत केलीच पाहिजे. ज्या प्रमाणे आपल सरकार असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी कर्जमुक्ती करा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

