सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा शासनाकडून योग्य सन्मान -डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई :
महाराष्ट्रात म्हाडाच्या धर्तीवर नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपदी मा ना श्री प्रवीण दरेकर यांची नेमणूक करून पदास कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिल्याच्या निमित्ताने आज विधान भवन येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ, विधान भवनचे अवर सचिव सुरेश मोगल, श्रीमती भक्ती भोसले शिवसेना महिला विभाग प्रमुख बांद्रा, मालती हवालदार घाटकोपर विभाग प्रमुख, शालिनी सुर्वे कुर्ला विभाग प्रमुख तसेच, इतर शिवसेना महिला कार्यकर्त्या प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. दरेकर हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेते असून त्यांचे प्रश्न विधिमंडळात हिरिरीने मांडण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात.त्यांच्या कार्य कर्तृत्वाला न्याय मिळाला असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना श्री दरेकर यांनी मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईतच घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.माथाडी कामगारांसाठी गृहकर्ज दिले,पहिली हाऊसिंग परिषद गोरेगाव मध्ये घेण्यात आली. तेथे मा. मुख्यमंत्री यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या. तसेच गृहनिर्माण संदर्भातील समितीचा अध्यक्ष या नात्याने सादर अहवाल मा. मुख्यमंत्री यांनी जसाच्या तसा स्वीकारला याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमावेळी मुंबै बँकेच्या सहकार्याने महिलांसाठी नवीन उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कर्जसुविधा, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या संदर्भात विशेष चर्चा पार पडली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन, सहकारी संस्था आणि बँकांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रवीण दरेकर यांनी या प्रसंगी महिलांसाठी बिनव्याजी कर्जसुविधा देण्याच्या संकल्पनेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, “महिलांना फक्त आर्थिक मदत पुरवणे पुरेसे नाही. त्यांना व्यवसाय सुरू करताना प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बँकांशी समन्वय साधणे ही जबाबदारी शासन आणि सहकारी संस्थांनी स्वीकारली पाहिजे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे.”
मुंबै बँकेने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी घेतलेले उपक्रम स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला उद्योगपतींसाठी स्वतंत्र योजना, बिनव्याजी कर्ज उपलब्धता आणि व्यवसायिक मार्गदर्शन या उपक्रमांतून महिलांना सक्षम बनविण्याची भूमिका त्यांनी मांडली.
शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकर यांचे अभिनंदन करताना, “महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उचललेले हे पाऊल समाजातील परिवर्तनाचे द्योतक आहे. महिलांना सक्षम केल्याशिवाय खरी प्रगती शक्य नाही,” असे मत व्यक्त केले.

