मुंबई, 02.10.2025
सोन्याच्या दागिन्यांवरील व सोन्याच्या वस्तूंवरील प्रमाणचिन्हांकन आदेश, 2020 चे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस), मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी 01 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील सोनापूर येथील एका दागिन्यांच्या दालनात शोधमोहीम राबवली. या छाप्यात दालनामध्ये विक्रीसाठी ठेवलेले भारतीय मानक ब्युरो प्रमाण चिन्ह नसलेले सोन्याचे दागिने आढळले. सुमारे 47 ग्रॅम सोन्याचे दागिने प्रमाणचिन्हाशिवाय आढळले असून ते जप्त करण्यात आले.
या उल्लंघनासंदर्भात, `बीआयएस` कायदा 2016 मधील कलम 15(3) व 17(1)(ए) अंतर्गत, दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान ₹2,00,000 दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती `बीआयएस`च्या अधिकाऱ्यांनी दिली.
`बीआयएस`ने ग्राहकांना आवाहन केले आहे की, `बीआयएस केअर अॅप`चा वापर करून कोणते उत्पादन `बीआयएस` प्रमाणित असणे बंधनकारक आहे याची माहिती मिळवावी. तसेच खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्ह किंवा हॉलमार्क यांची सत्यता पडताळा. यासाठी http://www.bis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तसेच, जर कुठे बंधनकारक उत्पादने `बीआयएस` प्रमाणनाशिवाय विक्रीस ठेवली जात असतील किंवा आयएसआय चिन्ह अथवा प्रमाणचिन्हाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्याची माहिती प्रमुख, `एमयुबीओ`, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, बीआयएस, 5 वा मजला, सीईटीटीएम संकुल, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 येथे कळवावी. अशा तक्रारी mubo1@bis.gov.in या ई-मेल पत्त्यावरही नोंदवता येऊ शकतात.

