पुणे- 02.10.2025
देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील आयसीएमआर-एनआयव्हीतर्फे (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था) किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील कर्वेनगर इथल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 30 सप्टेंबर, 2025 रोजी हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थिनींचे किशोरवयीन आरोग्य, मासिक पाळीची स्वच्छता आणि डिजिटल सुरक्षिततेबद्दल संवादात्मक पद्धतीने उदबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे समन्वयन विज्ञान भारती या संस्थेने केले.
आयसीएमआर-एनआयव्हीतील शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात 250 किशोरवयीन मुलींचा सहभाग होता. यात किशोरवयीन आरोग्य, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि डिजिटल प्लॅटफॉर्म व सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मोकळेपणाने संवाद साधता यावा, यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करून देण्यात आले. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि किशोरवयीन आरोग्य या सत्रात पौगंडावस्था,मासिक पाळीचे चक्र, प्रक्रिया, मासिक पाळीबद्दलची मिथके, सॅनिटरी पॅड वापरण्याचे फायदे आणि स्वच्छतेसाठी आवश्यक माहिती, या विषयांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, डिजिटल सुरक्षा आणि सोशल मीडिया जागरूकता सत्रात सायबरबुलिंग, डिजिटल अटक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या जबाबदार आणि सुरक्षित वापरासाठी व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकून जबाबदार ऑनलाइन वर्तनाला प्रोत्साहन देण्यात आले.
विद्यार्थिनींना आपल्या शंका विचारता याव्यात यासाठी प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले. यातील खुल्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्यात आले आणि जबाबदार डिजिटल वर्तन स्वीकारण्यास मार्गदर्शन करण्यात आले.
सत्राच्या शेवटी, सत्रात सहभागी मुलींना मासिक पाळीविषयक स्वच्छता सामग्रीचे वाटप करण्यात आले.
आयसीएमआर एनआयव्हीविषयी :
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाअंतर्गत एक प्रमुख राष्ट्रीय संशोधन संस्था आहे. संस्थेने देशात क्रिमियन काँगो रक्तस्रावी ताप विषाणू, निपाह विषाणू आणि झिका विषाणू यासारख्या उच्च परिणामकारक रोगजनकांचे जलद निदान करण्यात आणि उद्रेक रोखण्यात योगदान दिले आहे. कायसनूर वन रोग विषाणू, जपानी एन्सेफलायटीस आणि सार्स कोव्ह -2 विषाणूंविरुद्ध लसी विकसित करण्यात आणि सार्वजनिक वापरासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेला अभिमान आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांच्या जाळ्यासाठी संसाधन केंद्र म्हणून काम करते. संस्थेच्या संशोधन उपक्रमांचे समन्वयन प्रख्यात शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीद्वारे केले जाते.

