पुणे _
२१ व्या शतकात विज्ञाननिष्ठ दृष्टी अंगीकारणे महत्वाची आहे. विज्ञानाने आज आपले दैनंदिन जीवन व्यापून टाकले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक गोष्ट शोधक वृत्ती आणि सुधारणावाद यामुळे पुढे येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे धार्मिक विरोध नाही. जसा काळ बदलला आहे त्याप्रमाणे धर्मात देखील वेळोवेळी सुधारणा झाल्या आहे. मानवाच्या कल्याण आणि सुसंस्कृत जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. याचे उद्घाटन बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते गांधी भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार,अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, विश्वस्त अन्वर राजन, उल्हास पवार, अभय छाजेड, एम.एस.जाधव, गोपाळ गुणले ,बौद्ध धर्मगुरू भंते सुदर्शन, मुस्लिम धर्मगुरू इसाक शेख, जैन श्रावक रेणुका कांकरिया, शीख धर्मगुरू पुनीत कौर, ख्रिश्चन धर्मगुरू प्रदीप चांदेकर, ज्यू धर्मगुरू योसेफ नोगावकर, हिंदू धर्मगुरू घैसास गुरुजी उपस्थित होते.
संविधान उद्देशिका अभिवादन नंतर सर्वधर्म प्रार्थना याप्रसंगी पार पडली.लेखक मामासाहेब देवगिरीकर लिखित ” सरदार वल्लभभाई पटेल” पुस्तक आणि लेखक जे.आर.कोकंडाकर लिखित ” गांधी विचारांचे महत्व” या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी पार पडले.याप्रसंगी ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान पार पडले.
न्या. ओक म्हणाले,महात्मा गांधी यांच्या वागणूकी मधून दुसऱ्याचा विचारांचा सन्मान करणे हे दिसून येते. हल्ली आपण रामराज्य म्हणतो त्यावेळी वेगळा विचार मांडला जातो. राम हे प्रतीक म्हणून गांधी यांनी शब्द वापरला, “हिंदू राज्य” असे त्यांना अभिप्रेत नव्हते. आदर्श राज्याची कल्पना त्यांनी मांडली होती. कराची काँग्रेसने १९३१ मध्ये फाशीची शिक्षा असू नये असा ठराव केला होता. मी अनेक वर्ष न्यायालयात काम केल्यामुळे सांगू शकतो की, फाशीची शिक्षा असू नये. मूलभूत कलम घटनेत आणले गेले ते मूलभूत स्वातंत्र्य कमी करण्यासाठी आणले गेले अशी काही चर्चा आहे. परंतु ५१ अ कलम मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश असल्याने ते खूप महत्त्वपूर्ण आहे त्यात संविधान पालन करण्यास सांगण्यात आले आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. आपले विचार मांडणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये येते. सन्मानाने जगण्यासाठी अर्थपूर्ण स्वातंत्र्य करिता नाटक, सिनेमा, व्याख्यान हे हवे आहे. माझ्या स्वातंत्र्य प्रमाणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा देखील विचार करून मानसन्मान केला पाहिजे.घटनेचा सन्मान करणे हे शासन व्यवस्थेचे सामूहिक कर्तव्य आहे. विचारांचे स्वातंत्र्य नसेल तर कलम ३१ ला कोणता अर्थ राहत नाही.गांधी यांचा विचारा बद्दल वेडेवाकडे विचार आज मांडले जातात कारण, आपल्याकडे विचार स्वातंत्र्य आहे त्यामुळे प्रत्येकजण आपली भावना मांडतो.घटनेचे पालन केले गेले पाहिजे त्याचा विसर पडला नाही पाहिजे. सामंजस्य आणि बंधुभाव हे तत्व गांधी यांनी सांगितले होते.ध्वनी, पाणी ,वायू , पर्यावरण प्रदूषण आहे तसे विचार प्रदूषण आहे त्याबाबत देखील विचार व्हावा. नदी प्रदूषण हे धार्मिक कारणाने होते याबाबत अनुभव आपल्याला मागील वर्षी पाहावयास मिळाले. कोणत्याही धर्मात नदीचे प्रदूषणबाबत सांगण्यात आले नाही. आपल्या अवतीभोवती किती हवा प्रदूषित झाली आहे त्याचा अनेकांना त्रास होत आहे. आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो कारण विकासाच्या कल्पना आपल्या चुकीच्या आहे. खरा विकास म्हणजे शहरात सर्वसामान्य व्यक्ती स्वस्तात घरे विकत घेऊ शकतो, सार्वजनिक वाहतूक सक्षम, आरोग्य सुविधा चांगल्या, उत्तम राहण्यासाठी वातावरण या गोष्टी महत्वाच्या आहे. अनेक तलाव नष्ट होत असून शहरा बाहेर कचरा डोंगर सध्या उभे केले जात आहे त्यामुळे रोगराई वाढून प्रदूषण वाढते. प्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे.
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले की, माझा आणि कुमार सप्तर्षी यांचा संबंध जुना असून त्यावेळी ते गांधीवादी नव्हते. युक्रांद संस्था मध्ये ते आक्रमक काम करत होते. अनेक न्यायाधीश निवृत्ती नंतर आराम करतात किंवा विविध ठिकाणी फिरतात. पण न्या. ओक हे लोकात फिरून त्यांच्या भावना जाणून घेत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. सन १९२० ते १९४७ दरम्यान महात्मा गांधी देशातील प्रमुख घटनेत अग्रेसर होते. ब्रिटिशपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य,अहिंसा,उपोषण, सत्याग्रह याचा शस्त्रासारखा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधी हे दूरदर्शी नेते होते त्यांनी आपल्या विचारांचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग केले. स्वतःचा वेश बदल केला, शेळीचे दूध पिणे सुरू केले, आश्रमात राहण्यास गेले, चरखा वापर, स्वदेशी वापर सुरू केला. टिळक, सावरकर काळात महिला स्वातंत्र्य चळवळीत दिसून येत नव्हत्या पण गांधी यांनी महिलांचा सहभाग स्वातंत्र्य चळवळीत प्रभातफेरीद्वारे करून घेतला. गांधी विचारांना देश विसरत चालला आहे. आपले पाश्चातीकरण केवळ ब्रिटिश यांच्यामुळे झाले नाही तर इतर देशांमुळे देखील झाले. गांधी हे मोठे नेते होते आणि आपण त्यांच्याकडून काय शिकवण घेतली हे पाहणे महत्वाचे आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, धर्म म्हणजे माणसाला माणसासाठी जे सांगितले जाते तो असतो. त्याविरुद्ध वागणे म्हणजे अधर्म आहे. न्याय सामान्य माणसांना समजेल असे सांगणे हे काम सध्या न्या.ओक करत आहे. हिंदू म्हणजे अहिंसा आणि प्रेम आहे. पण राष्ट्रवाद म्हणून सध्या वेगळे स्वरूप अंधभक्तद्वारे स्पष्ट होत आहे.
सोनम वांगचुक यांची लवकर सुटका व्हावी
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, गांधी हत्या नंतर देशातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि देशभरात गांधी भवन उभारण्याचा निर्णय झाला. गांधी विचार समाजात रुजवा यासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात आले. पुण्यातील गांधी भवन एक सांस्कृतिक भवन म्हणून नावारूपास आले. आजच्या काळातील प्रश्नांचे उत्तर गांधी विचार मधून मिळवण्याचा प्रयत्न जागर द्वारे करण्यात येत आहे.
गांधी विचार यासाठी काम करणारे आजचे नेते सोनम वांगचुक यांना बेकायदेशीर अटक झाली आहे. त्यांची लवकर सुटका झाली पाहिजे. गांधी विचार अमर असून सत्याचा नेहमी विजय होत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन अन्वर राजन यांनी केले. मोहिनी पवार यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

