प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांचे प्रतिपादन
‘भरत करंडक एकांकिका स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : जगभरात आज कित्येक ठिकाणी शस्त्रास्त्रांचा वापर होत आहे. निवडक धनाढ्यांच्या गरजेसाठी लढाया केल्या जात आहेत. पण रंगकर्मींचे शस्त्र म्हणजे शब्द आहे. त्यामुळे आपण शस्त्रांचे नव्हे तर शब्दांचे पूजन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी बुधवारी येथे केले.
भरत नाट्य मंदिर संशोधन मंदिर ही संस्था विजयादशमीच्या दिवशी कलाप्रवासाची १३१ वर्षे पूर्ण करत आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भरत करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि संस्थेचे दसरा महोत्सवांतर्गत देण्यात येणारे संस्था कलाकार पुरस्कार, अशा दुहेरी समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या सदाशिव पेठ येथील नाट्यगृहात सायंकाळी हा कौतुक सोहळा साजरा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
चिन्मय कटके (उत्कृष्ट नाट्य कलाकार), स्वानंद नेने (उत्कृष्ट संगीत वादक), रावी पागे (सर्वोत्कृष्ट बालकलाकार), दीपकराज दंडवते (संस्था कलाकार – नियोजन), प्रियांका गोगटे (गुणवंत संस्था कलाकार), राजन कुलकर्णी (संस्था नाट्य कलाकार), भालचंद्र कुलकर्णी (नाट्यसमीक्षक – अभ्यासक) आणि रवींद्र खरे (नाट्यविषय़क कारकीर्द) या पुरस्कारांचे या समारंभाच्या पूर्वार्धात वितरण करण्यात आले. तसेच पडद्यामागील कलाकारांच्या सुतार आणि सुधीर फडतरे यांच्या पाल्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सामाजिक सेवाभावी संस्थांना देण्यात येणारे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री सहायता निधी आणि रेणू गावस्कर यांच्या एकलव्य न्यास यांना देण्यात आले. नेमिनाथ मरसुते यांना रसिक सन्मान तर विश्वास पांगारकर यांना कार्यसन्मान देऊन गौरव करण्यात आला.
अतुल पेठे पुढे म्हणाले, “तेच ते करत राहिलो तर कुणीच पाहणार नाही. त्यामुळे नाटकात प्रयोग असलेच पाहिजेत. नव्या नाटकवाल्यांनी प्रयोग करायला शिकले पाहिजे. मात्र, अलीकडे नाटकाची ही जाण आणि जाणीव, दोन्ही दिसत नाही. एक विचित्र झिंग समाजाला आली आहे, असे वाटते. आपला ८० टक्के समाज मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ताणतणावग्रस्त, दडपण, दबाव, स्पर्धा, आव्हाने… त्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे, त्यासाठी नाटक ही उत्तम थेरपी आहे. फक्त नाटकातच तुम्हाला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी मिळते. असे आत शिरणे शिकण्यासाठी नाटक करायचे असते. नाविन्याचे स्वागत करणे, नाविन्याला सामोरे जाणे, नव्या गोष्टींचे अर्थनिर्णयन करणे, आवश्यक आहे. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांचा अपवाद करता, राज्यात इतरत्र नाटकाची अवस्था भीषण आहे. त्यामुळे स्पर्धांमधून मोठ्या संख्येने भाग घ्या, नाटक करत राहा. त्यातील सबटेक्स्ट समजून घ्या. समकालीन संदर्भ ताजे ठेवा. नाटकाची आणि नव्या प्रयोगांची जोपासना आवश्यक आहे”.
सीए विजयकांत कुलकर्णी म्हणाले, “भरत नाट्य संशोधन मंदिरासारखी संस्था माईलस्टोन आहे. त्यामुळे नाटकाला, रंगकर्मींना दिशा मिळते. कुठलीही कला एका दिवसात अवगत होत नाही. वर्षानुवर्षांची साधना आणि परंपरेचे संचित त्यासाठी लागते. तब्बल १३१ वर्षांचा असा वारसा भरतकडे आहे. संस्था आपल्या कलाकारांचा असा सन्मान करते, सामाजिक सेवा पुरस्कार देते, हे लक्षणीय आहे. संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या निधीत मी २६ हजारांची भर घालून, एकूण ५१ हजारांचा निधी या कार्यासाठी देऊ”, असे ते म्हणाले.
परीक्षकांच्या वतीने अरुण पटवर्धन आणि गौरी लोंढे यांनी मनोगत मांडले. ‘स्पर्धकांनी एकांकिकेची रंगीत तालीम मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, नेपथ्य, संगीत या पूरक घटकांचा योग्य वापर केला पाहिजे. ज्येष्ठ स्पर्धकांनी आधी तरुणाईचे काम पाहिले पाहिजे’, असे त्यांनी सुचवले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व एकलव्य न्यासाच्या रेणू गावस्कर म्हणाल्या, ‘४० वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, ते समाजातील संवेदनशील मनांमुळेच. मदतीचे हात वेळोवेळी मिळत गेले आहेत. मात्र, आजही आपल्या संस्थेत थोड्याच मुलांसाठी आपण काम करू शकतो. अजूनही कित्येक मुले रस्त्यावरच आहेत. ती समाजाच्या मुख्य धारेत कशी येतील, हा विचार सतत असतो. पण समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक वाटते’.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.अभय जबडे यांनी परिचय करून दिला. स्पर्धेचे परीक्षक अरुण पटवर्धन, सुप्रिया गोसावी, गौरी लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. अविनाश ओगले यांनी आभार मानले. वैद्य प्रचीती सुरू यांनी सूत्रसंचालन केले.
वामन आख्यान ठरले करंडकाचे मानकरी
भरत करंडक एकांकिका स्पर्धेत मॉडर्न महाविद्यालयाच्या वामन आख्यान या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. १० हजार रुपये, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रेवन एन्टरटेन्मेंट च्या पेडल टू द मेडल, या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. ७ हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पीव्हीजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कोयता या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला. ५ हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या झांगडगुत्ता या एकांकिकेला सांघिक उत्तेजनार्थ आणि वसंतदादा पाटील इन्स्टिटूट ऑफ टेक्नालाॅजीच्या देव रोकडा सज्जनी या एकांकिकेला सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी असे –
अन्वी बनकर, अनिकेत सकपाळ (लेखन प्रथम), प्राज्वल पडळकर (लेखन द्वितीय) मुकुल ढेकळे (लेखन उत्तेजनार्थ)
अनिकेत खरात व विराज दिघे (दिग्दर्शन प्रथम), रूपेश रवींद्र (दिग्दर्शन द्वितीय), अथर्व किरवे (दिग्दर्शन उत्तेजनार्थ)

