पुणे: अमेरिकन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मगरपट्टा रस्त्यावरील अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मुख्य चालक-मालकांसह ३२ जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने केलेल्या या कारवाईत बुधवारी (ता.३०) मार्वल फिगो इमारतीमधील तीन कार्यालयांमधून १५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मगरपट्टा परिसरातील मार्वल फिगो इमारतीमध्ये कॉल सेंटरमधून नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉल सेंटरचे चालक-मालक निर्मल अजय शहा (वय ३८, रा. कुमार पिकासो सोसायटी, हडपसर), अतुल प्रवीण श्रीमाळी (वय ३०, रा. लेबरनम पार्क सोसायटी, मगरपट्टा) आणि युगंधर संजय हादगे (वय ३४, रा. शिवकृष्ण हाउसिंग सोसायटी, मांजरी बुद्रूक) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी कॉल सेंटरमधील २९ कर्मचाऱ्यांसह ३२ जणांना ताब्यात घेतले असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.
सीझन मॉलजवळील मार्वल फिगो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०१०, ४०२० आणि ४०३० या क्रमांकांच्या कार्यालयात अवैधरीत्या कॉल सेंटर सुरू होते. या सेंटरचे चालक आणि कर्मचारी अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल, लॅपटॉप व संगणकात मालवेअर (पॉपअप) टाकून त्यांना घाबरवत असत.
नंतर त्यांना कॉल करून बँक खात्यांमधील माहिती व क्रेडिट कार्ड तपशील चोरीची भीती दाखवून अँटिव्हायरस अॅप, प्रोटेक्शन सेटिंग्जच्या नावाखाली क्रिप्टोकरन्सी स्वरूपात पैसे उकळत असत. या छाप्यात २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाईल, ७ राऊटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा १५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
युनिट पाचचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल रसाळ, छबू बेरड, प्रमोद खरात, संतोष तानवडे, अभिजित पवार यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. अशा सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित आर्थिक व्यवहार, क्रिप्टो वॉलेट्स आणि आरोपींचे परदेशी कनेक्शन तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

