मुंबई :\ पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेने महाराष्ट्र हळहळत असताना, त्याच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने हलकं का असेना, आपल्या यशाने सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट या पठ्ठ्याने करुन दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी एकही लाईफलाईन न वापरता, तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात कैलास कुंटेवाड यांची कमाल दाखवण्यात आली. कैलास यांनी तब्बल 14 प्रश्नांची उत्तर बिनचूक दिली. पुढे 1 कोटी रुपयांसाठी त्यांना 15 वा प्रश्न विचारण्यात आला.
कैलास कुंटेवाड यांनी पहिल्या प्रश्नापासूनच धडाकेबाज सुरुवात केली. कैलास यांनी 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. त्यानंतर त्यांनी साडेसात लाखांच्या 11 व्या प्रश्नांचंही उत्तर त्यांनी बरोबर दिलं. मग 12 व्या प्रश्नावेळी त्यांना ऑडियन्स पोल घ्यावा लागला, त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मदत घेऊन उत्तर बरोबर दिलं. एक लाईफलाईन संपली असताना, पुढची उत्तरं बरोबर दिल्याने त्यांची ती लाईफलाईनही जिवंत झाली
कैलास हे शेती करतात. महिन्याला 3-4 हजार रुपये अशी त्यांची कमाई. कैलास यांना क्रिकेटचं प्रचंड वेड. क्रिकेटपटू होऊन राष्ट्रीय संघात खेळण्याचं त्यांचं स्वप्न. पण घरची परिस्थिती गरिबीची, त्यात शेतकरी कुटुंब आणि ग्रामीण जीवन, त्यामुळे क्रिकेट हे फक्त मनोरंजनापुरतंच राहिलं. आता कैलास यांनी आपलं स्वप्न मुलांकरवी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ज्यावेळी कैलास कुंटेवाड यांना 13 वा प्रश्न विचारला, त्यावेळी ते थोडे संदिग्ध झाल्याचं दिसून आलं. परंतु त्यांनी एक पर्याय निवडला आणि तो अचूक आला. त्यानंतर 50 लाखांसाठीचा 14 वा प्रश्न विचारला आणि तोही बरोबर आला.
अमिताभ बच्चन यांनी कैलास यांना एक कोटी रुपयांसाठी 15 वा प्रश्न विचारला. त्यासाठी कैलास यांनी संकेत सूचक लाईफलाईन वापरली. त्यातून हिंट मिळाल्यानंतरही कैलास त्या उत्तराबाबत साशंक होते. त्यामुळे त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली. दोन ऑप्शन गायब झाल्यानंतरही कैलास त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हते. शेवटी 50 लाखांच्या रकमेसह कैलास यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

