पुणे : नवरात्र उत्सवात देवीला नारळाचे तोरण बांधण्याची परंपरा आहे परंतु शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने महाराष्ट्रावरील पुराचे संकट लक्षात घेऊन उत्सवाला सामाजिक जोड देत शैक्षणिक साहित्याचे तोरण बांधले. या आगळ्यावेगळ्या तोरणातून बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना हिंमत देत शिक्षणाची नवी आशा जागवण्यात आली आहे.
काळी जोगेश्वरी मंदिराचे विश्वस्त वदन भिडे व मिलन भिडे यांच्या हस्ते डॉ. मिलिंद भोई यांना शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर साहित्याचे वितरण स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. काही पूरग्रस्त कुटुंबांकरिता धान्य आणि कपडे देखील सेवा मित्र मंडळातर्फे पाठविण्यात आले आहेत.
मंडळाचे नितीन होले, सचिन ससाने, अमर लांडे, विक्रांत मोहिते, राजेंद्र कांचन, प्रदुम्न पंडित, कुणाल जाधव, ओम पासलकर, साहिल चव्हाण, यश सावंत आणि अथर्व बांदल यांनी उपक्रमाचे संयोजन केले.
शिरीष मोहिते म्हणाले, पुरामुळे बीडमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, विद्यार्थ्यांचे दप्तर व शैक्षणिक साहित्य वाहून गेले. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवानिमित्त सेवा मित्र मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याच्या मदतीला सुरुवात केली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर देखील उस्मानाबादमधील लोकांना आवश्यकतेप्रमाणे धान्य,कपडे आणि शैक्षणिक साहित्याची मदत केली जाणार आहे, या संदर्भात देखील मंडळाचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

