पुणे, दि. १ ऑक्टोबर : शासनाच्या स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांमधील एकूण २३५ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार , विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी गजानन पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे, डॉ. भगवान पवार, उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे, डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, दिपाली देशपांडे-सावेडकर, अपर आयुक्त (विकास), पुणे विभाग, नितीन माने, अपर आयुक्त (आस्थापना), पुणे विभाग तसेच ससून, औंध सर्वोपचार रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथील वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र हंकारे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत सुमारे ३१०० शिबिरे घेण्यात आली असून, तब्बल २.५० लाख महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे निदान झालेल्या महिलांना शासनामार्फत मोफत उपचार दिले जात आहेत.
या अभियानाचे कौतुक करताना श्री.गजानन पाटील यांनी सांगितले की, “शासनाच्या आरोग्य विभागाकडील या अभियानाचा लाभ शासकीय कार्यालयांनी अधिकाधिक घेतल्यामुळे अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.” तसेच, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपासणीबरोबरच एकल महिलांची तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
अपर आयुक्त श्री. नितीन माने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगून आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. दरम्यान, डॉ. भगवान पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व महिला व बालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कामाच्या ताणतणावातून मुक्त राहण्यासाठी नियमित योगाभ्यास व संतुलित आहाराचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, सोशल मीडियावरील जाहिराती वा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार टाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिबिरादरम्यान विविध तज्ज्ञांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.

