पुणे : विद्यार्थ्यांचे हित, अध्यापनातील गुणवत्ता, संशोधनास चालना आणि उच्च शिक्षणाचा सर्वांगीण विकास यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून कार्यरत राहीन, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सत्कार प्रसंगी बोलताना दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सिनेट सदस्य म्हणून झालेली नेमणूक ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक कामकाजाला निश्चितच नवी दिशा मिळेल.”
या गौरवाबद्दल आमदार शिरोळे यांनी कुलगुरूंचे आभार मानले. सिनेट सदस्य या नात्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजामध्ये माझे सक्रीय योगदान राहील, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यापीठातील सिनेट सदस्य, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

