पुणे : अल्फा इव्हेंटस्तर्फे ‘स्वरार्चना’ ही सायंकालीन रागांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. मैफल शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सेवा भवन, सी. डी. एस. एस. चौक, एरंडवणे येथे होणार आहे.
या मैफलीत ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याची तालीम लाभलेल्या प्रसिद्ध गायिका स्मिता देशपांडे यांचे गायन होणार आहे.
संगीत कुटुंबात जन्मलेल्या स्मिता देशपांडे यांना प्रसिद्ध गायिका अलका देव-मारुलकर तसेच पंडित विवेक जोशी यांच्याकडून मार्गदर्शन लाभले आहे. पारंपरिक ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायकीचे सुमधुर मिश्रण हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे.
भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या अपर्णा पणशीकर यांना सुरुवातीस पंडित भास्करबुवा जोशी यांचे मार्गदर्शन मिळालेले असून सध्या त्या त्यांच्या मातोश्री विदुषी मीरा पणशीकर यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेत आहेत.
कलाकारांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

