पुणे : केंद्रात कित्येक वर्षे असलेले भाजपचे नामांकित मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात येऊन हवेत उडणाऱ्या बसेस आणण्याची वल्गना करत त्याबाबतचा डीपी महापालिका आयुक्तांना करण्यास सांगितले होते या हवेत उडणाऱ्या बसेस जशा भुलभुलैय्या ठरल्या तशाच पद्धतीने येरवडा ते कात्रज दरम्यानच्या बोगद्याची २० कि.मी. लांबीच्या बुयारी मार्गाची ७५०० कोटी रुपये खर्चाची संकल्पना देखील भूलभूलैय्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यानच्या बोगद्याची संकल्पना महापालिका स्तरावर गुंडाळण्यात आली आहे. व्यवहार्यदृष्टया या बोगद्याची उपयुक्तता आणि खर्चही परवडणारा नसल्याने आम्ही या बोगद्याच्या कामाला विरोध केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या निर्णयामुळे सारसबाग ते शनिवार वाडा आणि शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान बोगद्याची संकल्पनाही संकल्पनाच राहाणार असल्यावर यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येरवडा ते कात्रज दरम्यान भुयारी मार्गाची संकल्पना मांडली होती. पीएमआरडीएला यासंदर्भातील विस्तृत अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. पीएमआरडीएने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्क नावाची एजन्सी नेमली आहे. नुकतेच झालेल्या पुम्टाच्या बैठकीमध्ये या अहवालाच्या प्राथमिक बाबींवर चर्चा झाली. त्यामध्ये सुमारे १८ ते २० कि.मी.लांबीच्या सहा लेन रस्त्याच्या दोन बोगद्यांच्या कामासाठी ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे.केवळ २० कि.मी. रस्त्यासाठी ७५०० कोटी रुपये खर्च ही महापालिकेच्या दृष्टीने प्रचंड मोठा आहे. या रस्त्याचा वापर आणि उपयोगही खर्चाच्या तुलनेने अगदी कमी वाहनांना होणार असल्याने व्यावहारीकदृष्टया हा प्रकल्प परवडणारा नसल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी येरवडा ते कात्रज बोगदा फिजिबल नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी देखिल मध्यवर्ती पेठांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाजीराव रस्त्यावर सारसबाग ते शनिवार वाडा तसेच शिवाजी रस्त्यावर शनिवार वाडा ते स्वारगेट अशा दोन बोगद्यांतील मार्गांची संकल्पना मांडली आहे. सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामाचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने नंतर हे काम महापालिकेकडे सोपविले आहे. रासने यांनी या नियोजीत बोगद्यांच्या मार्गांची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दोन महिन्यांपुर्वी कसबा मतदार संघामध्ये आणले होते. परंतू शनिवार वाड्याजवळील वाहतूक कोंडीमध्ये गडकरी यांचा ताफा अडकला. त्यामुळे गाडीतून न उतराच गडकरी तेथून परत गेले. शनिवार वाडा ही हेरीटेज वास्तू असून वाड्याच्या १०० मीटर परिसरात खोदाई तर सोडाच परंतू बांधकामाला देखिल बंदी आहे. त्यामुळे अगोदरच अडचणींचा डोंगर असलेला आणि सुमारे दोन ते अडीच हजार कोटींच्या या प्रकल्पालाही महापालिकेकडून रेड सिग्नल मिळणार हे स्पष्ट होत आहे.

